लॉकडाऊनमध्ये रेल्वेचाच आधार ; २० दिवसात अडकलेल्या  ६८७५९ कामगारांना पोहोचवले त्यांच्या घरी ...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी : २० दिवसात अडकलेल्या  ६८७५९ कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ ७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे .

  लॉक डाऊन सुरु  झाल्यानंतर विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला . अचानक आलेल्या या संकटाच्या काळात कोकण रेल्वेने मालगाडींची वहातुक सुरु ठेवत महाराष्ट्र ,कर्नाटक ,गोवा राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वहातुक करत निर्माण होणारी टंचाई टाळण्यात महत्वाची भूमिका पार पाडली . या नंतर पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या खताचा पुरवठा हि या तिन्ही राज्यांच्या विविध भागांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला . आणि आता गेल्या वीस दिवसापासून कोकण रेल्वे कामगार आणि त्यांच्या अडकलेल्या कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम नियोजनबद्ध रीतीने करते आहे .

हेही वाचा- सिंधुदुर्गात त्या सहापैकी एका रूग्णाचा आधीच झाला होता मृत्यू...  

  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लॉक डाऊन पासून विविध राज्याचे हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते . रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश ,बिहार, कर्नाटक,झारखंड ,मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांकरिता खास ट्रेन सोडण्यात आल्या . महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या १३ श्रमिक स्पेशल ट्रेन मधून १५६७७ श्रमिक आणि त्याचे कुटुंबीय रवाना झाले . रत्नागिरी सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन ट्रेन मधून ४०१६,बिहारला दोन ट्रेन च्या  माध्यमातून २६४३ ,कर्नाटक मध्ये तीन ट्रेन च्या माध्यमातून ३६८० ,झारखंड येथे तीन ट्रेन च्या माध्यमातून ३५०१,मध्यप्रदेश ला एक ट्रेन च्या माध्यमातून ११६४ तर राजस्थान ला एक ट्रेन च्या माध्यमातून ६७३ कामगार रवाना  झाले .

हेही वाचा- सिंधुदुर्गात त्या सहापैकी एका रूग्णाचा आधीच झाला होता मृत्यू...

 गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातूनही कोकण रेल्वेच्या माध्यमातून  श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांना देशाच्या विविध भागात पोहोचवण्यात आले . गोव्यातून ३६ ट्रेन च्या माध्यमातून ५०५१८ श्रमिक त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचले . तर कर्नाटक मधून दोन ट्रेन च्या माध्यमातून २५६४ कामगार आणि कुटुंबियांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले .

हेही वाचा-बेळगाव ब्रेकिंग - राज्यात पावणे दोनशे जणांना कोरोनाची लागण

कोकणरेल्वेच्या मार्गावर श्रमिकांची हि वाहतूक अजूनही सुरु आहे .  पुढील काही दिवसात मागणीनुसार श्रमिकांना त्यांच्या घरी त्यांच्या राज्यात पोहोचवण्यकरिता कोकण रेल्वे ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देत आहेत . गेल्या वीस दिवसात या हजारो कामगारांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वेच्या अधिकारी वर्गापासून कामगार वर्गापर्यंत सगळ्यानी अहोरात्र मेहनत घेतली . हजारो कामगार त्यांच्या सामानासह जाताना करण्यात आलेल्या अचूक  नियोजनामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय हि संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात कोकण रेल्वेला यश आलं .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kokan Railway Performance In 20 days 68759 stranded workers were delivered to their homes