Photo : मेहनतीवर पाणी फिरल्याचं दुःख ठेवले बाजूला,ओल्याच भाताची मळणी झाली सुरू

राजेश कळंबटे 
Friday, 16 October 2020

कजरघाटी येथील शेतकऱ्यांनी भात झोडून घेण्यास सुरुवात केली आहे. 

रत्नागिरी : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात सुरु झालेले पावसाचे तांडव शमलं. पावसानं उघडीप दिली. किनारी भागात झालेलं भात शेतीच नुकसान पाहण्यासाठी शेतकरी बाहेर पडू लागले आहेत. काहींनी ओलं झालेलं भात तसंच झोडायला सुरुवात केलीय. तर काही शेतकरी वळवण्यासाठी मोकळ्या जागेत घेऊन जात आहेत.  तीन महिन्याच्या  मेहनतीवर पाणी फेरल्याचं दुःख उराशी बाळगून सकाळ पासून शेतकरी शेतात राबताना दिसत आहेत. 

 परतीच्या मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई,  हरचेरी, पोमेंडी, कजरघाटी,  सोमेश्वर, निवळी, कोंडवी,  बावनदी यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यात पावसानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. नदीकिनारी असणारी भात शेती पूर्ण पाण्याखाली गेली वाहून गेली. अनेक शेतात कापून ठेवलेले पीक वाहून गेले, वर्ष भर कुटुंबाला पुरेल या हेतूने शेतकरी रक्त आटवून घाम गाळून केलेल हाता तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या कोपामुळे वाहून गेले. कापलेले भात सुरक्षित पणे घरात आणता आले नाही, तर काहींनी पावसामुळे कापले नव्हते ते सर्व पीक आडवे पडले व तिथेच रुजले.

कोंडवी, निवळी,  टिके येथे चक्क पावसात भिजत शेतकऱ्यांनी कापलेलं भात मोकळ्या मैदानात आणून सूखत ठेवलं. शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होत. तरीही नव्या उमेदीने शेतकरी सकाळी 7 वाजल्यापासून शेतात खपत होते. भिजलेल्या भातातुन काहीच मिळणार नाही हे माहिती असूनही आशेने भिजलेले भात गोळा करत होते.  तांदूळ मिळणार नाहीत,  पण किमान कणी तरी होईल. पेंढा मिळाला नाही तरी भिजलेले भात सुकवून ठेवू. अशा आशेने शेतकऱ्याचे हात शेतात राबत आहेत. कजरघाटी येथील शेतकऱ्यांनी भात झोडून घेण्यास सुरुवात केली आहे. 

 

खूप शेतकरी अश्रू गाळत आहेत. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी.

 -  सुयोग उर्फ दादा दळी, माजी तालुका सरचिटणीस भाजप  व चांदेराईचे माजी सरपंच.

 

मेहनत वाया गेलीय, पण भिजलेले भात वाळवून सुकवायचं. त्यातून काहीच हाताला लागणार नाही. काही मिळणार नाही,  त्यापेक्षा भात झोडून कनण्या मिळतील.

- बाळकृष्ण शिंदे,  कजरघाटी शेतकरी.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kokan Rain Update Flood impact farming ratnagiri story by rajesh kalmbate