कोकणचे किनारी पर्यटन धोकादायक

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 17 एप्रिल 2017

वायरी येथील समुद्रात काल बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राध्यापकासह आठ जणांचा मृत्यू झाला. या भागात जीवरक्षक नसल्यानेच अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

मालवण : कोकणातील किनारपट्टी भागात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतींनी जीवरक्षक नियुक्त करण्याच्या सूचना देण्याबरोबरच काही तुटपुंजा निधी देत शासनाने जबाबदारी झटकल्याचेच चित्र आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक रेस्क्‍यूसह अन्य अत्यावश्‍यक साहित्यच उपलब्ध करून न दिल्याने कोकण किनारपट्टी भागासाठी असलेली ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटकांचे मृत्यू होत असून, याला अपुऱ्या सुरक्षा उपयांमुळे वायरीसारख्या दुर्घटना वारंवार घडत आहेत; मात्र याकडे शासनच गंभीर नसल्याचे चित्र आहे. 

वायरी येथील समुद्रात काल बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राध्यापकासह आठ जणांचा मृत्यू झाला. या भागात जीवरक्षक नसल्यानेच अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शासनाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उभ्या केलेल्या यंत्रणेविषयीची माहिती घेतली असता यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.

शासनाने 29 सप्टेंबर 2016 मध्ये शासन निर्णय काढत रत्नागिरी, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी गावात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सप्टेंबर 16 ते मार्च 2017 या कालावधीसाठी प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर दोन जीवरक्षकांची नियुक्ती करण्याची तसेच प्रत्येक जीवरक्षकास 6 हजार रुपये मानधन देण्याची सूचना पर्यटन विभागास केली. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक गावासाठी जीवरक्षकांचे मानधन तसेच लाइफ जॅकेट, औषधे अन्य साहित्यासाठी 1 लाख 34 हजार रुपये देण्याचे निश्‍चित करण्यात आले. यात चार जिल्ह्यांसाठी 45 लाख 56 हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. सुरवातीस जीवरक्षक नियुक्तीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे सोपविल्यानंतर यावर्षीपासून त्या त्या किनारपट्टी भागातील ग्रामपंचायतींनी जीवरक्षकांची नियुक्ती करून त्यांचे मानधन स्वनिधीतून देण्याची सूचना केली. 

शासनाच्या या निर्णयात काही त्रुटी असल्याचे आढळून आले. यात देवबाग, तारकर्ली, वायरी ही तीन स्वतंत्र गावे असताना या तिन्ही गावांसाठी मिळून केवळ दोनच जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या तिन्ही गावांचा विचार करता सुमारे पंधरा किलोमीटर लांबीची किनारपट्टी असल्याने एवढ्या मोठ्या क्षेत्रात पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ दोन जीवरक्षकांवर सोपविणे शक्‍य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रश्‍नासंदर्भात जिल्हा सागरी सुरक्षा तसेच पर्यटन विभागाच्या बैठकीत स्थानिक प्रशासनाकडून लक्ष वेधत देवबाग, तारकर्ली, वायरी या तीन गावांसाठी स्वतंत्र जीवरक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शासनाने 3 मार्च 2017 ला सुधारित शासन निर्णय काढत तारकर्ली, वायरी या दोन गावांसाठी स्वतंत्र जीवरक्षक नियुक्तीस मंजुरी दिली. 

किनारपट्टी भागात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली, मात्र पर्यटनाचा हंगाम हा मे महिन्यापर्यंत असताना शासनाने केवळ सप्टेंबर ते मार्च या सात महिन्यांच्या कालावधीपर्यंतच जीवरक्षकांच्या नियुक्तीस परवानगी दिली. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतीने जीवरक्षकांची नियुक्ती करून त्यांचे मानधन स्वनिधीतून देण्याच्या सूचना केल्या. जीवरक्षकांना 6 हजार रुपये मानधन निश्‍चित केले आहे. जीवरक्षक म्हणून मच्छीमार समाजातील तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र त्यांना दिले जाणारे मानधन हे फारच अत्यल्प आहे. कारण हेच तरुण जर स्कुबा, वॉटरस्पोर्टस्‌च्या कामास गेले तर त्यांना दिवसा 1200 ते 1500 रुपये मिळतात. त्यामुळे जीवरक्षक म्हणून दहा ते बारा तास सेवा बजावून केवळ सहा हजार रुपयांच्या मानधनासाठी जीवरक्षक म्हणून काम करणे परवडत नसल्याचे जीवरक्षकांचे म्हणणे आहे.

शिवाय संबंधित गावातील ग्रामपंचायतींचे उत्पन्न मोठे नसल्याने त्यांना जीवरक्षकांचे मानधन देणे शक्‍य नसल्याचे चित्र आहे. वास्तविक शासनाने आपल्या स्तरावरून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांना शासनाने आपल्या स्तरावराव नियुक्ती व यंत्रणा पुरविणे आवश्‍यक आहे; परंतु शासनाने ग्रामपंचायतींनाच जीवरक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना करत आपली जबाबदारी झटकण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. 

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी किनारपट्टी भागातील प्रत्येक गावात दोन जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र या जीवरक्षकांना केवळ रिंगबोया, काही ठिकाणी दुर्बिण, लाइफ जॅकेट एवढेच किरकोळ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्यक्षात जीवरक्षकांना रेस्क्‍यू, ओळखपत्र, ड्रेसकोड, सर्फिंग बोर्ड, वॉकीटॉकी, दोरी, स्ट्रेचर यासारख्या सुविधाच उपलब्ध करून न दिल्याने या जीवरक्षकांना बुडणाऱ्यांना वाचविणे अशक्‍य बनत असल्याचे दिसून आले आहे. किनारपट्टी भागात सध्या पाहणी मनोरे चुकीच्या ठिकाणी उभारले आहेत. जास्त उंचीच्या या पाहणी मनोऱ्यांवरून उतरून जीवरक्षकांना समुद्रात बुडणाऱ्याला वाचविण्यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्‍यता असल्याने गोव्याच्या धर्तीवर पाहणी मनोरे उभारणे आवश्‍यक बनले आहे. रिसॉर्टमध्ये रिंगबोया, दहा लाइफ जॅकेट तसेच सुरक्षिततेविषयीचा फलक लावल्याशिवाय संबंधित व्यावसायिकांना नाहरकत दाखला देण्यात येऊ नये, अशी सूचना शासनाने संबंधित विभागास द्यायला हव्यात. 

जीवरक्षकांची नियुक्ती गरजेची 
किनारपट्टी भागात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती शासनाने केली आहे, मात्र दहा ते बारा तास सेवा बजावून मिळणारे सहा हजार रुपयांचे मानधन हे फारच अत्यल्प आहे. कामाचे तास पाहता शासनाने हे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. रेस्क्‍यू, ड्रेसकोड, ओळखपत्र, सर्फिंग बोर्ड, बॅटरी यासह अन्य अत्यावश्‍यक साहित्य उपलब्ध करून द्यायला हवे. किनारपट्टी भागात ज्या ठिकाणी रिसॉर्ट असतात, त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठी असते. त्याव्यतिरिक्त अन्य किनारपट्टी भागात पर्यटक समुद्रात उतरल्यास त्यावर लक्ष ठेवणे शक्‍य होत नाही. त्यामुळे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर जीवरक्षकांची नियुक्ती असायला हवी. त्याचबरोबर पर्यटकांसाठी समुद्रस्नानासाठीचे क्षेत्र ठरवून द्यायला हवे. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविताना एखाद्‌प्रसंगी जीवरक्षकाचाही जीव जाऊ शकतो, याचा विचार करून शासनाने त्यांना विमा संरक्षण द्यायला हवे. जीवरक्षकांच्या भवितव्याचा विचार करता त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यायला हवे.

Web Title: Kokan Tourism is becoming dangerous for tourists