कोळंब पुलाची पुन्हा तपासणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोळंब पुलाचे खांब तसेच काही भाग धोकादायक बनले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कमानीही उभारण्यात आल्या आहेत.

मालवण - तालुक्‍यातील कोळंब पूल धोकादायक बनल्याने तो अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आज मुंबईतील एसएएस एंटरप्रायझेस या खासगी संस्थेच्या तज्ज्ञांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तसेच स्कूबा डायव्हिंग पथकाच्या मदतीने पाण्याच्या खाली जात पुलाच्या खांबांची पाहणी केली. ही तपासणी दोन दिवस चालणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता योगराज देवरे यांनी दिली. 

कोळंब पुलाचे खांब तसेच काही भाग धोकादायक बनले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कमानीही उभारण्यात आल्या आहेत. आज या पुलाची पाण्याखाली जाऊन पाहणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पुलाखालील पाणी, तसेच पुलाच्या खांबांची पाण्याखालील मजबुती याची पाहणी करण्यात आली. यात पुलाला पडलेल्या भेगा, तडे यांची यंत्राच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात या पुलाच्या खांबांचे आयुर्मान तपासण्यात येणार आहे. तसेच नवीन पुलाची उभारणी कशा पद्धतीने करणे आवश्‍यक आहे याचा अहवाल तयार करून तो सार्वजनिक बांधकाम विभागास सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार या पुलाची दुरुस्ती करावी की नव्याने पूल उभारण्यात यावा याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या कोळंब पुलाच्या कामाला या अहवालावरून गती मिळेल असे तपासणी करणाऱ्या कंपनीच्या संजय भोसले यांनी या वेळी सांगितले. स्कूबा डायव्हर्सच्या सहाय्याने सकाळपासून पुलाच्या खांबांची तपासणी करण्यात येत असून यात दिनेश कुमार, जितेंद्र सिंग, स्कूबा डायव्हर मनोज कुमार यांचा सहभाग आहे.

Web Title: kolamb bridge damaged