कोलगावात अखेर कमळ; शिवसेनेला धक्का

kolgaon gram panchayat election konkan sindhudurg
kolgaon gram panchayat election konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या कोलगावमध्ये अखेर कमळ फुलले. या ग्रामपंचायत निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मतदानादिवशी याठिकाणी झालेला कथीत जादूटोण्याचा प्रकारही चर्चेचा विषय ठरला होता; मात्र भाजपाचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी आपल्या बंधूसह तब्बल दहा उमेदवार निवडून आणत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांना पराभव चारत जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाची परतफेड केली. तळवडे ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी शिवसेनेकडे सत्ता देत कै.प्रकाश परब यांचे नाव राखले. 

तालुक्‍यातील तळवडे आणि कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. याठिकाणी दोन्ही सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर आपला दावा केला होता. यात कोलगावमध्ये शिवसेनेने तर तळवडेमध्ये भाजपाने ग्रामपंचायतीमध्ये आपलाच विजय असल्याचे स्पष्ट केले होते. तशी तयारीही दोघांकडून करण्यात आली होती; मात्र महेश सारंग यांनी मायकल डिसोजा यांच्या हातातील कोलगाव ग्रामपंचायतची सत्ता हिसकावून घेतली. शिवसेनेने तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या मदतीने तळवडेतील पंकज पेडणेकर यांच्या ताब्यातील भाजपाची सत्ता काबीज केली. एकूणच श्री. पेडणेकर आणि श्री. डिसोजा यांना हा पराभव पचविणे कठिण होणार आहे. 

कोलगाव ग्रामपंचायतीचा विचार करता याठिकाणी शिवसेनेकडून हायटेक प्रचार करण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री. डिसोजा यांनी युवा वर्गापर्यंत पाच वर्षातील विकासकामे पोचवली होती. दुसरीकडे भाजपाने शिवसेनेवर असलेली मतदारांची नाराजी लक्षात घेता योग्य व्युहरचना आखली होती. याचा फायदा याठिकाणी भाजपाला झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये श्री. सारंग यांना अवघ्या 56 मतांचा पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव कोलगावसह पंचक्रोशीतील सारंग समर्थकांना जिव्हारी लागला होता. त्यामुळे याचा वचपा काढण्यासाठी सारंग समर्थकांनी कोलगाव ग्रामपंचायतीमध्ये जोरदार प्रयत्न लावले होते.

विशेष म्हणजे कोलगाव ग्रामपंचायतीची जबाबदारी खुद्द श्री. सारंग यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि यात यशस्वी होत सारंग यांनी गत ग्रामपंचायत निवडणुकीचा पराभव आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभव दोन्ही पराभवाची परतफेड केली. त्यामुळे श्री. डिसोजा यांना हा पराभव सहसा पचवणे कठीण होणार आहे. डिसोजा यांनीही पाच वर्षात कोलगावमध्ये चांगल्या प्रकारे विकासकामे केली होती; मात्र मतदारांनी त्यांना का नाकारले याचे आत्मपरीक्षण त्यांना करावे लागणार आहे. 

तळवडे ग्रामपंचायतीमध्ये गत निवडणुकीत भाजपाने प्रकाश परब यांच्या हातातून सत्ता काबीज केली होती. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाने त्याठिकाणी वर्चस्व राखले होते, प्रकाश परब यांच्या निधनानंतर याठिकाणी काही शिवसेना बॅकफूटवर गेली होती; मात्र आज भाजपच्या ताब्यातून सत्ता काबीज करत शिवसेनेने कै. परब यांना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली.

ग्रामपंचायतच्या रणधुमाळीमध्ये याठिकाणी भाजपाने मोठी खेळी खेळली होती; मात्र ही खेळी मोडून काढण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राऊळ यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या मदतीने तळवडे ग्रामपंचायतीमध्ये विशेष लक्ष घातले होते. त्याचेच फलीत आजच्या निकालातून दिसून आले. दुसरीकडे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये भाजपावर असलेली नाराजीही मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिली. हा पराभव माजी सभापती पेडणेकर यांना जिव्हारी लागणारा आहे. याठिकाणी भाजपाने मोठे प्रयत्न केले होते; मात्र अपेक्षेप्रमाणे त्यांना जागा मिळाले नाहीत. 

कोलगाव विजयी उमेदवार प्रतिक्षा धुरी, संतोष राऊळ, आशिका सावंत, रोहित नाईक, शिवदत्त घोगळे, गौरी करमळकर, प्रणाली टिळवे, संदीप हळदणकर, रसिका करमळकर, आत्माराम चव्हाण, दिनेश सारंग, हेमांगी मेस्त्री, संदीप गवस, मारिया डिमेलो. तळवडे विजयी उमेदवार स्मिता परब, मंगलदास पेडणेकर, केशव परब, किशोरी कुंभार, अंकिता भैरे, सुरेश मांजरेकर, स्नेहल राऊळ, नम्रता गावडे, गजानन जाधव, गौरव मेस्त्री, प्राजक्ता गावडे, वनिता मेस्त्री,अक्षता परब. 

कोलगावच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. यापुढेही जनतेसोबत राहू. आमच्या ताब्यात असलेल्या पाच सीटच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावू. 
- मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना 

शिवसेनेने जनतेला विकासाची स्वप्ने दाखवली; मात्र प्रत्यक्षात कामे केली नाही. त्यामुळे जनतेने आमच्या हातात सत्ता दिली आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या माध्यमातून गावातील जनतेला आवश्‍यक असलेल्या सोयी सुविधा देण्यासोबत गाव विकासाच्या दिशेने नेऊ. 
- महेश सारंग, जिल्हा सरचिटणीस, भाजप

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com