माणूस जोडणार्‍या योगाची जगाला गरज - अभिजित घोरपडे

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 21 जून 2018

रत्नागिरी - आज समाजमन वैफल्यग्रस्त झाले आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा या शृंखलांनी माणूस विफलित झाला आहे. माणूस माणसापासून दुरावला जातोय. स्वतःपासून तो परका होतोय. अशा वेळी मनं साधणार्‍या, माणूस जोडणार्‍या योगाची नितांत आवश्यकता आहे. योगाने अंतर्मन तेजाळून टाकतो, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.

रत्नागिरी - आज समाजमन वैफल्यग्रस्त झाले आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा या शृंखलांनी माणूस विफलित झाला आहे. माणूस माणसापासून दुरावला जातोय. स्वतःपासून तो परका होतोय. अशा वेळी मनं साधणार्‍या, माणूस जोडणार्‍या योगाची नितांत आवश्यकता आहे. योगाने अंतर्मन तेजाळून टाकतो, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.

पतंजली योग समिती व परिवारातर्फे मराठा मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सलग चौथ्या वर्षी ‘सकाळ माध्यम समूहाने’ या उपक्रमासाठी सहकार्य केले. शहरातील सर्व योगकक्षांमधील योग शिक्षक या वेळी उपस्थित होते.

ते म्हणाले की, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगायोग नाही. वार्षिक कालचक्रातला हा सर्वांत मोठा दिवस असून जगन्नियंता सूर्यनारायण बाह्यसृष्टीला प्रकाशमान करतो. त्याचप्रमाणे योग आंतरसृष्टीला प्रकाशमान करतो. युज् या संस्कृत धातूपासून योग झाला. जुळतो तो योग. शरीराचा मनाशी, व्यक्तीचा समष्टीशी व जीवाचा शिवाशी योग करायचा हेच मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. महर्षी पतंजली यांनी पाच हजार वर्षांपूर्वी अष्टांगदर्शन लिहिले व योगाची शास्त्रशुद्ध माहिती दिली. आज भारतच नव्हे तर पाश्‍चिमात्य राष्ट्रांनीही योगाचे मान्य केले आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे जीवनदर्शन आहे. खर्‍या अर्थाने जागतिकीकरणात दळणवळण क्रांती, जग जवळ येतेय, विश्‍वाला मानवतेला जोडणारा योग आपण साजरा करतोय. योगाचे हे सामर्थ्य लक्षात घेऊन तो अंगिकार करावा, प्रचार, प्रसार करावा.

जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, महिला पतंजली समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य रमा जोग, समितीचे जिल्हा प्रभारी अ‍ॅड. विद्यानंद जोग, भाऊ देसाई उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरवात झाली. योगशिक्षक भारत सावंत यांनी रत्नागिरीचे दर्शन घडवणारे गीत सुरेल आवाजात सादर केले. महाराष्ट्र योग प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी केला. अनंत आगाशे यांनी पतंजली परिवाराची सर्व माहिती दिली. युवा स्वावलंबन शिबिर, तसेच पतंजली बीएसएनएलच्या कार्डची माहितीसुद्धा देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी केली योगासने

रत्नागिरीची आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे या दोघी भगिनींनी र्‍हिदमिक योगाची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच जिल्हा योग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनीही विविध आसने दाखवली. सहा महिने स्पर्धांसाठी बाहेर असलेल्या दहावीच्या दोघा विद्यार्थ्यांनी 95 टक्के गुण मिळवल्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयातील योगा प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी आवर्जून सांगितले. तसेच दीड लाख रुपये शिष्यवृत्ती जिल्ह्याला मिळाली, त्यातील 75 हजार रुपयांची शिष्यवृत्ती योगपटूंना मिळाल्याचे आवर्जून सांगितले.

 

Web Title: Kolhapur News Abhijeet Ghorpade comment