आंगणेवाडीत शनिवारी भाविकांचा कुंभमेळा 

प्रशांत हिंदळेकर
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मालवण - दक्षिण कोकणची काशी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या तालुक्‍यातील आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. आंगणेवाडीवासिय भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.

मालवण - दक्षिण कोकणची काशी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या तालुक्‍यातील आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. आंगणेवाडीवासिय भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.

भाविकांना देवीचे लवकरात लवकर दर्शन घेता यावे यासाठी चांगले नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी यात्रेत कृषी प्रदर्शन तसेच हालता देखावा भाविकांचे खास आकर्षण असणार आहे. 

आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा 27 ला होत आहे. गेले महिनाभर आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ तसेच प्रशासनाच्यावतीने यात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. यावर्षी प्रथमच कृषी प्रदर्शन तसेच सिंधू सरस प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

यात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आंगणेवाडी मंदिर परिसरात हॉटेल्स, मिठाई तसेच अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर बच्चे कंपनीचे आकर्षण ठरणारा आकाश पाळणा तसेच अन्य मनोरंजनाची दुकानेही थाटण्यात आली आहेत. त्याचबरोबर आंगणेवाडी प्राथमिक शाळेनजीक मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेला हालता देखावा भाविकांचे खास आकर्षण ठरणार आहे. 

आंगणेवाडी यात्रेसाठी जिल्ह्यात रेल्वे, खासगी, एसटी बसने चाकरमानी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील वर्दळ वाढली आहे. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर एसटी प्रशासनाच्यावतीने खास नियोजन करण्यात आले आहे. शहरातील बसस्थानक तसेच अन्य ठिकाणाहून थेट आंगणेवाडी येथे मध्यरात्रीपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परतीच्या प्रवासासाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने विविध खात्याचे मंत्री, आमदार, खासदार, राजकीय पदाधिकारी, सिने कलावंत यांची उपस्थिती असते. यावर्षीही भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य नेते देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार हेही यात्रेच्या निमित्ताने येथे येत आहेत. महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य नेतेही भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. 
यात्रेच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्या वतीने वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. शहरासह तालुक्‍यातील विविध गावांमध्ये झेंडे, बॅनर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. भाजपच्यावतीने मोफत चष्मा वाटप, मधुमेह तपासणी तसेच 50 हजार मोफत पिशव्यांचे वाटप, शिवसेनेच्यावतीने सरबत वाटप तसेच अन्य विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध राजकीय पक्षांनी भाविकांच्या स्वागतासाठी आपले कक्षही उभारले आहेत. 

यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भराडी देवीचे दर्शन भाविकांना तत्काळ घेता यावे यासाठी मालवण तसेच कणकवलीच्या दिशेने सात रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री साडे नऊ वाजता ताटे लावण्याचा कार्यक्रम असल्याने या काळात ओट्या भरणे बंद राहणार असून बारा वाजल्यापासून पुन्हा ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरवात होणार आहे. ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पूर्वी प्रसाद उडविण्याची प्रथा होती; मात्र ही प्रथा बंद करण्यात आली असून हा प्रसाद भाविकांना गावातील आंगणे कुटुंबीयांच्या घरी उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. 

पोलिस यंत्रणा सज्ज... 
यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांचे फिरते गस्ती पथकही कार्यरत राहणार आहे. याशिवाय महसूल, पंचायत समिती प्रशासनाच्यावतीनेही आरोग्य तसेच अन्य सोयी सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

Web Title: Kolhapur News Anganewadi Yatra