जमिनी घेऊन बक्कळ पैसा करण्याच्या स्वप्नांवर पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

राजापूर - ऑगस्ट २०१७ नंतर रिफायनरीच्या परिसरात खरेदी-विक्री व्यवहार झालेल्या जमिनींचा विचार मोबदल्याच्या पॅकेजमध्ये केला जाणार नाही. त्याबाबतचे एक परिपत्रकही जाहीर झाले आहे. भविष्यात मिळणाऱ्या मोबदल्याचे भरमसाट पॅकेज डोळ्यांसमोर ठेवून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरात जमीन खरेदी-विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. या पद्धतीने मालामाल होऊ पाहणाऱ्यांच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फिरले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी  झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या परिपत्रकामुळे शासनाच्या भरमसाट मोबदल्याच्या पॅकेजवर डोळा ठेवून झालेली जमीन खरेदीमधील गुंतवणूक अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. रिफायनरीच्या भवितव्याच्या मुद्दा सध्या चर्चेत असताना शासकीय मोबदल्याच्या वाटपाचा नवा पैलू आता चर्चेत आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. माने यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यावर प्रकाशझोत टाकला. रिफायनरी होणाऱ्या परिसरात ऑगस्ट २०१७ नंतर जे जमीन खरेदी व्यवहार झाले आहेत, ते व्यवहार शासनाकडून देण्यात येणाऱ्या जमीन मोबदल्यामध्ये विचारात घेतले जाणार नसल्याचे माने यांनी सांगितले. प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेचा संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला दिला जाणार आहे. 

या रग्गड मोबदल्यावर डोळा ठेवून गेल्या काही महिन्यांमध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे बोलले जाते. यामध्ये स्थानिकांसह विविध भागातील लोकांनी काही लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याचेही बोलले जात आहे. या व्यवहाराच्या माध्यमातून जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला जसे पैसे मिळाले. त्याप्रमाणे या व्यवहारामध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणाऱ्या अनेक एजंटांनी आपले उखळ पांढरे करून मोठ्या प्रमाणात फायदा लाटला. मात्र हे जमीन खरेदी व्यवहारच मोबदल्यावेळी विचारात घेतले जाणार नसतील तर या झालेल्या जमिनी खरेदीतून केलेली गुंतवणूक अडचणीत येणार. 

मोजणीचे काम अपूर्ण
या प्रकल्पासाठी तालुक्‍यातील कार्शिंगेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पाळेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ, गोठीवरे अशी चौदा, तर गिर्ये-रामेश्‍वर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे. संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीचे काम प्रशासनाने हाती घेतले होते, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे मोजणीचे काम अपूर्ण राहिले आहे.

Web Title: Kolhapur News Bal Mane Press