जलसंवर्धनाच्या नव्या मॉडेलची गरज

जलसंवर्धनाच्या नव्या मॉडेलची गरज

सिंधुदुर्गातील पाणीटंचाई दूर करायची झाल्यास उर्वरित महाराष्ट्राला लागू असलेली उपाययोजना करून चालणार नाही. येथील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून टंचाई निवारण उपायांचे स्वरूप ठरवायला हवे. येथे नद्यांचा वेग कमी करून पाणी जास्तीत जास्त जमिनीत साठवण्याबरोबरच वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढवायला हवे. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाबरोबरच लोकांमध्ये जलसाक्षरतेची गरज आहे, असा सूर येथे ‘सकाळ’तर्फे घेतलेल्या सिटिझन एडिटर उपक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला.

पाणीटंचाई ही भविष्यातील मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी पाण्याचा वापर कमी आणि पाण्याची साठवणूक क्षमता जास्त, अशी परिस्थिती होती. आता तो काळ राहिलेला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी तशीच राहण्यासाठी योग्य ते नियोजन होणे काळाची गरजेचे आहे. वृक्षलागवड वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत.
- निकिता सावंत, 

उपसभापती पंचायत समिती सावंतवाडी

पाणीटंचाई आराखडा हा मार्च-एप्रिलऐवजी डिसेंबर-जानेवारीतच व्हावा. त्यासाठी प्रशासनाने सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळपाणी योजनेला मीटर बसविणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. पाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.’’
- गुलाबराव गावडे, 

   माजी सरपंच चौकुळ

जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदी वगळता सर्व नद्या या समुद्राकडे जाणाऱ्या आहेत. त्यामुुळे हे पाणी समुद्राला वेगाने जाऊन मिळते. मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी योग्य तो आराखडा आखून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यात लोकसहभाग गरजेचा आहे. येथे जलसंवर्धनासाठी वेगळी मॉडेल तयार करावी लागतील. नद्यांचा वेग कमी करून पाणी जिरवले पाहिजे. मृदा संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे. पाण्याचा वापर कमी करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.
- प्रशांत चव्हाण,
कृषी अधिकारी पंचायत समिती, सावंतवाडी 

सह्याद्री पट्ट्यात जांभा दगड प्रामुख्याने जलसंवर्धनाचे काम करतो; मात्र मोठ्या प्रमाणातील बेसॉल्ट खडक पाणी साठवत नाही. असे असले तरी त्याच्या वरच्या बाजूला आणि भेगांमध्ये पाणी साठते. या नैसर्गिक रचनेचा अभ्यास करून येथे जलसंवर्धन उपाय आखणे आवश्‍यक आहे. विदर्भ-मराठवाड्यातील पॅटर्न येथे वापरून उपयोग नाही. येथील नैसर्गिक डोह टिकवण्याबरोबरच नद्यातील गाळ काढायला हवा.
- प्रा. हसन खान, 

भूगर्भ रचना अभ्यासक

जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याच्या साठवणुकीसाठी मोठे काम झाले आहे. आज त्याचा फायदा अनेक गावांना होत आहे. भविष्यात पाणी अडविण्यासाठी बंधारे उभारण्यात आल्यास त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होणार आहे. वाढत्या बोअरवेल हे टंचाईचे कारण ठरणार आहे. यामुळे बोअरवेलच्या उभारणीला निर्बंध यायला हवेत.
- नारायण परब, 

प्रतिनिधी लुपिन फाऊंडेशन, 

पाण्याचा कितीही पुरवठा केला तरी पाणीच मिळत नाही, अशी बऱ्याचशा गावांत ओरड आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. पूर्वी पाणी पुरवणारे अनेक स्त्रोत होते; मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. अनेक ठिकाणी नद्या आटतात. बरेच पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहेत.
- दिनेश सावंत,
सरपंच माजगाव

सद्य:स्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून बोअरवेलची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे पाण्याच्या मर्यादित वापराबाबतही जागृती हवी. कोकणातील भूगर्भ रचना वेगळी आहे. सह्याद्रीच्या जवळ असणाऱ्या भागात जमिनीपासून अधिक जवळ बेसॉल्ट खडक असल्याने पाणी साठवण्यास मर्यादा येतात. येथील भौगोलिक रचनेचा अभ्यास करून पाणी योजना राबविणे आवश्‍यक आहे. येथे छोटी-छोटी धरणेही गरजेची आहेत.
- सुदेश राणे,
अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com