‘भाग्यश्री’चा फटका ४५० ‘सुकन्यां’ना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

रत्नागिरी - कोणत्याही सरकारी योजनेचे निकष बदलल्यानंतर जुन्या निकषांवर आधारित प्रस्तावांचा विचार केला जात नाही. याचा फटका ‘सुकन्या’ योजनेसाठीच्या साडेचारशे इच्छुकांना बसला आहे. ‘सुकन्या’चे नामांकरण ‘माझी कन्या भाग्यश्री’ असे करण्यात आले. त्यासाठी उत्पन्नाचा निकष बदलण्यात आला.

रत्नागिरी - कोणत्याही सरकारी योजनेचे निकष बदलल्यानंतर जुन्या निकषांवर आधारित प्रस्तावांचा विचार केला जात नाही. याचा फटका ‘सुकन्या’ योजनेसाठीच्या साडेचारशे इच्छुकांना बसला आहे. ‘सुकन्या’चे नामांकरण ‘माझी कन्या भाग्यश्री’ असे करण्यात आले. त्यासाठी उत्पन्नाचा निकष बदलण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचारशे इच्छुक योजनेपासून वंचित राहणार आहेत. जुन्या योजनेसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी अवघे पन्नास प्रस्तावच पात्र ठरले, अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीला आर्थिक लाभ देण्यात येतात. त्यानुसार शासनाने २०१४ ला योजना प्रभावीपणे अमलात आणण्यास सुरुवात केली. त्या योजनेचे निकष बदलून २०१६ ला पुन्हा लोकांसाठी खुली केली. त्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठीचे उत्पन्न एक लाख रुपये ठेवण्यात आले होते. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्यांची छाननी न झाल्यामुळे ते प्रलंबित ठेवण्यात आले. त्यातील काही प्रस्ताव एक मुलगा व एक मुलगी झालेल्यांचेही होते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेतील उत्पन्नाची मर्यादा साडेसात लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या निश्‍चितच वाढेल.
- एम. आर. आरगे,

महिला व बाल कल्याण अधिकारी

प्रस्तावांची छाननी होण्यापूर्वी शासनाने सुकन्या योजनेचे नाव बदलून माझी कन्या भाग्यश्री असे केले. ही योजनेत १ ऑगस्ट २०१७ ला किंवा त्यानंतर जन्मलेली मुलगी असावी, असा निकष ठेवण्यात आला आहे. तसेच सुकन्या योजनेसाठी प्रस्ताव सादर केलेल्यांमध्ये १ ऑगस्टपूर्वी जन्मलेल्या मुलीला भाग्यश्री योजनेत समाविष्ट करता येणार नाही, असे स्पष्ट नमूद केले आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील अनेकांना बसला.

५ जानेवारीला वणंद येथे चित्ररथ
माझी कन्या भाग्यश्री, जाणीव जागृती अभियानांतर्गत चित्ररथ तयार करण्यात आला आहे. रमाई आंबेडकर यांच्या जन्मगावी वणंद (दापोली) येथे ५ जानेवारीला सकाळी १० वाजता हा चित्ररथ दाखल होणार आहे. त्याचे स्वागत जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामस्थांतर्फे करण्यात येणार आहे. रथाद्वारे भाग्यश्री योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. भाग्यश्री योजनेत मुुलीच्या नावे ५० हजार रुपये बॅंकेत ठेवले जाणार आहेत. दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केली तर दोघींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये ठेवण्यात येणार आहेत. त्याचे व्याज ६ व्या व १२ व्या वर्षी काढता येईल. तसेच १८ व्या वर्षानंतर मुद्दल व व्याज संबंधित मुलीला मिळणार आहे.

सुकन्या योजनेसाठी पाचशे प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाकडे आले होते. नवीन योजना लागू झाल्यानंतर त्या प्रस्तावांची छाननी करण्यात आली; मात्र त्यातील पन्नास प्रस्तावच पात्र ठरले आहेत. उरलेल्यांमध्ये १ ऑगस्टपूर्वी जन्मलेल्या मुलींचाच सर्वाधिक समावेश आहे. शासनाने निकष बदलले असले तरीही जुन्या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे आवश्‍यक होते. जुने प्रस्ताव प्रलंबित का राहिले याचा शोध घेऊन शासनाने नवीन योजनेची अंमलबजावणी केली नाही.

Web Title: Kolhapur News 'Sukanya' change to 'My daughter Bhagyashree' issue