शिवसैनिकांनी अस्तानीतला निखारा ओळखावा - सूर्यकांत दळवी

चंद्रशेखर जोशी
मंगळवार, 12 जून 2018

दाभोळ - पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच शिवसेनेत वेळोवेळी गद्दारी केली होती. त्यांनीच अनंत गीते, किशोर कानडे यांच्यासारख्या अनेकांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे मी वारंवार सांगत होतो. माझ्या विधानाला गीते यांनी औरंगाबाद येथे दुजोरा दिला असून शिवसैनिकांनी आतातरी अस्तानीतला निखारा कोण आहे हे ओळखले पाहिजे, असे मत दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

औरंगाबाद येथे तीन दिवसांपर्वी एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी ‘मी निवडणुकीत पराभूत होण्यासाठी रामदास कदम यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या मुलाला आमदार करण्यासाठी ते माझ्या कार्यालयात आले होते, असे सांगितले होते. 

अनंत गीतेंच्या याच विधानाचा धागा पकडून सूर्यकांत दळवी म्हणाले की, गेली 25 वर्षे दापोली विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकत होता. मात्र रामदास कदम यांच्या आसुरी इच्छेने त्यांनी माझा पराभव करण्याचा चंग बांधला. दुर्दैवाने ते त्यामध्ये यशस्वी झाले. यामध्ये माझे नुकसान किती झाले, यापेक्षा राज्यात युतीचे सरकार असताना दापोलीचा जो विकास होऊ शकला असता तो झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

मी राजकारणात केवळ बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आलो. जसा शिवसेनेत घराणेशाहीला विरोध केला जातो, त्यापद्धतीने मी माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जबरदस्तीने राजकारणात आणले नाही. याउलट सदानकदा पक्षाच्या विरोधात कारवाई करणार्‍या रामदास कदमांनी आपली दोन्ही मुले राजकारणात सक्रिय केली. आता मुलाला आमदार करण्यासाठी रामदास कदम विविध तडजोडी करत आहेत. 

याच तडजोडीचा एक भाग म्हणून ते अनंत गीते यांना भेटले व दोघांमधील दुरावा संपुष्टात आल्याचे चित्र रेखाटले गेले. यामध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच ठरवेल. मात्र रामदास कदमांनी याप्रमाणे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी वाद मिटवले असते, तर आज दापोलीत जशी प्रबळ शिवसेना दिसत आहे, तशी प्रबळ शिवसेना त्यांना खेडमध्ये उभी करता आली असती.

अनंत गीते हे शिवसेनेचे नेते असल्याने त्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस रामदास कदमांनी केले नाही. मात्र जे खरे आहे ते कधी ना कधी बाहेर येतेच, याची प्रचिती सर्वांना आली. आतातरी शिवसैनिकांनी जागृत होऊन घराणेशाहीला विरोध करावा, असे मत दळवी यांनी व्यक्त केले.

Web Title: Kolhapur News Suryakant Dalavi comment