कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला गती

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला गती

सावंतवाडी - कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन व इतर कामांना सुरवात होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत झाला. 

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम दोन वर्षे रखडले होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षे होत होती. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला प्रत्यक्ष आकार येऊ लागला. २०१५ मध्ये कोकण रेल्वेमार्फत जे. पी. इंजिनिअरिंगला या मार्गाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम दिले. सॅटेलाईट सर्व्हे करून कोकण रेल्वेमार्फतच याचा अहवाल केंद्राला सादर केला. यानंतर २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात श्री. प्रभू यांनी या मार्गासाठी २५० कोटींची तरतूद जाहीर केली. प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

एसपीव्ही योजनेतून केंद्र आणि महाराष्ट्र शासनाची संयुक्त कंपनी स्थापन करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी यासाठी ३२०० कोटी खर्च अपेक्षित होता; मात्र गेली दोन वर्षे या प्रकल्पाबाबतची प्रक्रिया थंडावली होती. केंद्रीय वाणिज्यमंत्री प्रभू यांचा नुकताच कोल्हापूर दौरा झाला. त्यांनी कोकण आणि कोल्हापूरला रेल्वेने जोडण्याच्या योजनेचा या वेळी पुनरुच्चार केला.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मंत्री प्रभू, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांच्यासह रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक दिल्लीत झाली. यात हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिल्लीतील उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही प्रकल्पाबाबत चर्चा झाली.

या वर्षअखेरीपर्यंत आवश्‍यक प्रशासकीय कामे, विविध परवानग्या यांसह भूसंपादनाचे काम सुरू करण्यावर एकमत झाले. यामुळे येत्या काळात प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने ठोस पावले पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवा मार्ग 

 सिंधुदुर्गातील मार्ग ः वैभववाडी रेल्वे स्थानक- सोनाळी- कुंभारवाडी कुसूर- उंबर्डे - मांगवली- उपळे - ऐनारी
 कोल्हापूरमधील मार्ग ः सैतवडे - कळे - भुये - कसबा बावडा - मार्केटयार्ड

असा असेल प्रकल्‍प

  •  संभाव्य रेल्वेमार्गाची लांबी ः      १०७ कि.मी
  •  नव्या मार्गातील स्थानकांची संख्या ः      १० 
  •  उड्डाणपुलांची संख्या  ः      ५
  •  बोगद्यांची संख्या ः      २६
  •  अंदाजित खर्च ः     ३२०० कोटी 
  •  २०१६ च्या अर्थसंकल्पातील तरतूद  ः      २५० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com