मानांकनात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचा ३२ वा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

मानांकन यादीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशात २४ व्या स्थानी व महाराष्ट्रात पहिले आहे. कोकण कृषी विद्यापीठ देशात ३२ व्या व महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आहे. 

दाभोळ - गतवेळी गुणवत्तेच्या मानांकनात घसरलेल्या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची गुणवत्ता यावेळी सुधारली आहे.नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचा ३२ वा क्रमांक आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्रात मानांकनात दुसरे आहे.

नुकतेच २०१८ सालचे  देशभरातील कृषी विद्यापीठांचे शैक्षणिक मानांकन जाहीर करण्यात आले आहे. गतवेळी यादीत कोकण कृषी विद्यापीठाचा ५९ वा क्रमांक होता. त्यामुळे यावेळी विद्यापीठाने हे मानांकन प्रकरण मनावर घेतले. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत व कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यावेळी मानांकन उंचावले जाईल यासाठी प्रयत्न केले. 

कृषी विद्यापीठाचा शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण विभागाच्या गुणवत्तेचा विचार, विश्‍लेषण करून कृषी विद्यापीठांची गुणवत्ता यादी दरवर्षी आयसीएआरकडून निश्‍चित केली जाते. यावर्षी कोकण कृषी विद्यापीठाने शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाने अंतर्गत गुणवत्ता समिती गठित केली होती.

या समितीच्या उपाध्यक्षपदी विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख तथा प्रभारी कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, सहयोगी अधिष्ठाता तसेच सहशैक्षणीक संचालक डॉ. विठ्‌ठल नाईक, डॉ. नांदगुडे, डॉ. उत्तम कदम यांचा या समितीत समावेश होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांच्या तुलनेत असलेले प्राध्यापकांचे प्रमाण, प्राध्यापकांचे विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय संशोधन पत्रीकांमध्ये प्रकाशित झालेले लेख या बाबींचा समावेश मानांकन देताना करण्यात येतो. मानांकन यादीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशात २४ व्या स्थानी व महाराष्ट्रात पहिले आहे. कोकण कृषी विद्यापीठ देशात ३२ व्या व महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Agricultural University in Dapoli rank 32 in country