बोरगाव सरपंचांस ठरवले अपात्र 

Konkan Commission Action On Borgaon Sarpanch Ratnagiri Marathi News
Konkan Commission Action On Borgaon Sarpanch Ratnagiri Marathi News

चिपळूण ( रत्नागिरी ) - चौदावा वित्त आयोगातील बेकायदा केलेला खर्च बोरगाव सरपंचांना भोवला आहे. याबाबत तक्रार झाल्याने कोकण आयुक्तांनी सरपंच हळदणकर यांना अपात्र ठरवले आहे. बोरगावंमध्ये मधुरा संतोष हळदणकर गेल्या वर्षापासून एकमेव सदस्या व सरपंच म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी डी. वाय. कांबळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. 

गेल्या पाच वर्षापासून बोरगांव ग्रामपंचायत नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी पाणी योजनेतील 20 लाखाचा घोटाळा उघडकीस आणला. त्यातून अधिकाऱ्यांचे निलंबन तर झालेच. शिवाय तीन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हेही दाखल झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कारभारी म्हणून काम करण्यास फार कोणी इच्छुक नव्हते. ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांपैकी चौघांनी निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने त्यांना प्रशासनाने अपात्र ठरवले होते. तर एकाने पदाचा राजीनामा दिला. एकास तिसरे अपत्य झाल्याने संबंधित सदस्य अपात्र झाला होता.

दरम्यान मधुरा हळदणकर या एकमेव सदस्या कार्यरत होत्या. ग्रामपंचायत सदस्य संख्या निम्म्याहून कमी झाल्याने दोन वर्षापूर्वी साळुंखे यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. मात्र एकमेव सदस्य कार्यरत असल्याचे कारण देत प्रशासनाने प्रशासकाची नियुक्ती केली नव्हती.

दरम्यान चौदावा वित्त आयोगाचा खर्च करताना नियमावलीला बगल देण्यात आल्याची तक्रार करून सरपंचांना अपात्र करण्याची मागणी विद्याधर साळुंखे यांनी केली होती. या प्रकरणी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडून चौकशी झाली. कोकण आयुक्तांनी हळदणकर यांना बडतर्फ केले .गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी विस्तार अधिकारी डी. वाय. कांबळे यांची नियुक्ती केली. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी प्रशासकांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार. आज प्रशासकांच्या उपस्थितीत महिला ग्रामसभा झाली.निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेण्यात आली. 

पुन्हा सर्व जागा रिक्त 

गत महिन्यात ग्रामपंचायतीत रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. मात्र एकानेही या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने पुन्हा सर्व जागा रिक्त राहिल्या होत्या. मे महिन्यात ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तोपर्यंत ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट राहणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com