सिंधुदुर्गात दिग्गजांना धक्के

नारायण राणे-दीपक केसरकर
नारायण राणे-दीपक केसरकर

केसरकर समर्थक शक्तिहीन ः मालवण कॉंग्रेसने गमावली मात्र देवगडात मुसंडी, भाजपचाही प्रभाव

सावंतवाडीः सिंधुदुर्गात पालिकांचे निकाल दिग्गजांना धक्का देणारे ठरले. शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या येथील होमपीचवर घटलेले मताधिक्‍य आणि कॉंग्रेसची मुसंडी चिंतेचे कारण बनली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालवणात शिवसेना भाजपने मिळविलेले निर्वीवाद यश नारायण राणेंसाठी धक्का म्हणता येईल. वेंगुर्लेत केसरकर समर्थक भुईसपाट झाले असले तरी भाजपने सहा जागांसह नगराध्यक्षपद मिळवत मुसंडी मारली. देवगडात कॉंग्रेस आमदार नितेश राणे फॅक्‍टर जोरात चालला.

सावंतवाडी पालिकेत गेल्या वेळी केसरकर समर्थक पॅनेलने सर्व 17 जागा जिंकत कॉंग्रेसला व्हाईटवॉश दिला होता. मात्र यावेळी मतदारांनी केसरकरांनाच धक्का दिला. शिवसेनेचे बबन साळगांवकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असले तरी पालिका मात्र त्रिशंकू बनली आहे. कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत आठ जागांवर विजय मिळविला. शिवसेना 7, भाजप आणि अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल झाले आहे. अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगांवकर यांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या.

देवगडमध्ये आमदार नितेश राणे फॅक्‍टर जोरात चालला. तेथील नगरपंचायतीसाठी झालेल्या या पहिल्याच लढतीत कॉंग्रेसने दहा जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे भाजपला 4, शिवसेना, अपक्ष आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. गोगटे आणि घाटे या अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादीच्या घराण्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मालवण पालिकेत कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला. तेथे कॉंग्रेस चार आणि राष्ट्रवादी दोन मिळून आघाडीला सहा, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच मिळून एकूण दहा तर अपक्ष एक असे बलाबल झाले आहे. तेथे भाजपचे महेश कांदळगांवकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले. येथे युतीची सरशी झाली.

वेंगुर्ले पालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तेथे गेल्या वेळी केसरकर समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत होते. यावेळी केसरकरांच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली. भाजपला सहा, कॉंग्रेसला 7, राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष 2 असे बलाबल राहिले आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे राजन गिरप विराजमान झाले. कॉंग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेली. येथेही सत्तेच्या चाव्या सुमन निकम आणि तुषार सापळे या अपक्षांच्या हाती राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com