महामार्गावर ६८० पोलिसांची कुमक तैनात - दीक्षितकुमार गेडाम

महामार्गावर ६८० पोलिसांची कुमक तैनात - दीक्षितकुमार गेडाम

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई-पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. महामार्गावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व अपघातविरहित व्हावा, यासाठी पोलिस दलाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. खारेपाटण ते झाराप दरम्यान ६८० पोलिस कर्मचाऱ्यांचे बळ वापरून महत्त्वाच्या ठिकाणी दहा (मिनी कंट्रोल रूम) पोलिस मदत केंद्रे स्थापन केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दीक्षितकुमार गेडाम बोलत होते. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे, मालवण पोलिस निरीक्षक अरविंद बोडके उपस्थित होते. या वेळी श्री. गेडाम म्हणाले, ‘‘२५ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. सर्वात मोठा सण असल्याने गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होतात. विविध चारचाकी वाहने, लक्‍झरी, खासगी बसेस एसटीच्या जादा गाड्या जिल्ह्यात येत असल्याने जिल्ह्यातील महामार्गावर वाहनाची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढते. गणेशोत्सवासाठी दोन दिवस अगोदरच चाकरमानी दाखल होणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये. गणेशभक्त चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा. अपघातविरहित प्रवास व्हावा, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणी पोलिस मदत केंद्र स्थापन करून वाहतुकीचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, सिलिंडर, मेडिसीन, भाजीपाला, जीवनावश्‍यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.’’
खारेपाटण ते झाराप दरम्यान महामार्गावर ६८० पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांसह कार्यरत राहणार असून चारचाकी व दुचाकी वाहनाने पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. हा पोलिस बंदोबस्त २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत राहणार असून त्यानंतर स्थानिक पोलिस गणेशोत्सवात वाहतुकीचे नियंत्रण करणार आहेत. आवश्‍यक त्या ठिकाणी अधिक पोलिस बळ देण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने विशेष दखल घेण्यात आली असून महामार्गावर कोंडी झाल्यास पर्यायी मार्गाचा तात्पुरता अवलंब करण्यात येईल. महामार्गावर वाहन बंद पडल्याने किंवा अपघात घडून वाहतुकीस अडथळा झाल्यास महामार्ग सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने क्रेनची व्यवस्थाही ठेवण्यात येणार आहे. सर्व पोलिस मदत केंद्रामध्ये पोलिस अधिकारी यांच्यासह वायरलेस सुविधा, वॉकीटॉकीचा वापर करून गणेशोत्सवातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकावर बंदोबस्त
खासगी वाहनाप्रमाणेच रेल्वेने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कणकवली, सिंधुदुर्ग (ओरोस), कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख रेल्वे स्थानकांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये, याबाबतची विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती गेडाम यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com