खरिपात शेती क्षेत्रात हजार हेक्‍टरने घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - शेतीला संरक्षण देण्यासाठी आधुनिकतेला जोड देणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय शासन घेत आहे; मात्र मजुरांचा अभाव, न परवडणारे बजेट, वातावरणातील बदल आणि नोकरीसह उद्योगांकडे वळणारा तरुण वर्ग यामुळे शेतीखालील जमीन क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आलेले नाही.

रत्नागिरी - शेतीला संरक्षण देण्यासाठी आधुनिकतेला जोड देणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय शासन घेत आहे; मात्र मजुरांचा अभाव, न परवडणारे बजेट, वातावरणातील बदल आणि नोकरीसह उद्योगांकडे वळणारा तरुण वर्ग यामुळे शेतीखालील जमीन क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आलेले नाही.

रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख १६ हजार ४३३ हेक्‍टर क्षेत्र असून खरीप हंगामात एक लाख आठ हजार हेक्‍टर क्षेत्र आणि रब्बी हंगामात आठ हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली दरवर्षी आणले जात होते. त्यापैकी ७४ हजार ७३८ हेक्‍टरवर भात, १७ हजार ७०० हेक्‍टरवर नागली तसेच वरी, कडधान्य, भाजीपाला व गळीत धान्याखाली सात हजार हेक्‍टरवर लागवड केली जाते. ९९ हजार ३४४ हेक्‍टरचे लक्ष्य खरीप लागवडीसाठी कृषी विभागाकडून निश्‍चित केले आहे. त्यातील ८२ हजार ६१७ हेक्‍टरवर लागवड झाली. १६,७२७ हेक्‍टरवर लागवड झालेली नाही. गतवर्षी ८३ हजार हेक्‍टरवर पिके घेण्यात आली. यावर्षी त्यात घट झाली असून ८२ हजार हेक्‍टरवर लागवड करण्यात यश आले आहे. गेल्या दहा वर्षात प्रत्येक वर्षी लागवडीखालील क्षेत्रात घट  होते आहे.

कोकणात पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. दुबार पिके ही संकल्पना सध्या रुजू लागलेली आहे. मुंबईतून येणाऱ्या मनीऑर्डरवर येथील कुटुंबांची गुजराण चालायची. गेल्या दहा वर्षांमध्ये हे चित्र पालटले. येथील तरुण पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांकडे वळू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांशेजारील गावांचे शहरीकरण होऊ लागले आहे. 

कोकण रेल्वेसह मोठ्या 
कंपन्या येऊ लागल्यामुळे शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. अनियमित पावसामुळे खरीप हंगामामधील भातशेतीकडे तरुण वर्ग पाठ फिरवू लागला आहे. किफायतशीर शेती करणे जिकिरीचे झाले आहे. मनुष्यबळाची समस्या आहे. तरुण वर्ग शेती कामात रमत नाही, शिवाय अर्धेलीने भातशेती करणे परवडत नसल्याने भातशेती सोडण्याचा पर्याय अनेकांनी स्वीकारला आहे. शिक्षणामुळे उद्योगांसह नोकरीला प्राधान्य दिले जाते. शेती हे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जात नाही. याचा परिणाम दरवर्षी शेतीचे क्षेत्र कमी होण्यात झाला आहे.

खरीप हंगामातील लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे मिळेल यादृष्टीने कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे. सध्या जिल्ह्याचे पर हेक्‍टरी उत्पादन २९.३० क्‍विंटल आहे. राज्याच्या रेशोपेक्षा हा दर अधिक आहे.
- आरिफ शहा, उपविभागिय कृषी अधिकारी

यावर्षी पोषक वातावरण
 खरीप पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. भात पिकाचे हळवे वाण पोटरी अवस्थेत आहे. गरवे व निमगरवे वाण फुटवा ते वाढीच्या अवस्थेत आहे. तसेच कडधान्य व गळीतधान्य वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भात पिकांवर निळे भुंगेरे या किडीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सद्यःस्थितीत पुरेशा प्रमाणात पाऊस असल्याने यावर्षी पिक परिस्थिती समाधानकारक असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

यावर्षी  लागवडीखालील क्षेत्र 
भात  ६८,१९४
नागली  १०,४७५
वरी  ४७६
कडधान्य  १,८९१
गळीतधान्य १,९६५

Web Title: konkan news agriculture