कृषी पर्यटनातून कोकणचे अर्थकारण बदलेल

शिरीष दामले 
बुधवार, 5 जुलै 2017

रत्नागिरी - केरळची पर्यटनाची वार्षिक उलाढाल ३० हजार कोटींवर पोहोचू शकते. कोकण त्यापेक्षा अंशमात्रही कमी नाही. ना निसर्ग संपन्नतेत, ना क्षमतेत. यामध्ये कृषी पर्यटनाचा वाटा सिंहाचा असतो. कोकणातही हे शक्‍य आहे; मात्र त्यासाठी स्वतः उद्योजक, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आणि सरकार यामध्ये समन्वय पाहिजे.

रत्नागिरी - केरळची पर्यटनाची वार्षिक उलाढाल ३० हजार कोटींवर पोहोचू शकते. कोकण त्यापेक्षा अंशमात्रही कमी नाही. ना निसर्ग संपन्नतेत, ना क्षमतेत. यामध्ये कृषी पर्यटनाचा वाटा सिंहाचा असतो. कोकणातही हे शक्‍य आहे; मात्र त्यासाठी स्वतः उद्योजक, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आणि सरकार यामध्ये समन्वय पाहिजे.

तसे झाल्यास पावसाळ्याचे चार महिने आणि आंबा-काजूच्या हंगामाचे दोन ते तीन महिने असा सहा महिन्यांहून अधिक काळ कोकणात कृषी पर्यटन बहरू शकेल. १७ वर्षांहून अधिक काळ कृषी पर्यटनासाठी संस्थात्मक पद्धतीने काम करणाऱ्या मीनल अनंत ओक यांना कोकणचे अर्थकारण याआधारे बदलता येईल, असा विश्‍वास आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पर्यटन विकास महामंडळाची घोषणा तर केली. आता त्यापुढे पावले पडली तर कृषी पर्यटनातून विकास साधता येईल, असा दावा त्यांनी केला. ‘कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था’ याच्या त्या चिटणीस आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून त्या याचा अभ्यासही करीत आहेत. कोकणातील पर्यटन उद्योगापुढील आव्हानांचा अभ्यास करून त्या पीएचडीही करीत आहेत. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात चार रिसर्च पेपर सादर केले आहेत. त्यामध्ये एक आहे तो ‘द रोल ऑफ ॲग्रो टुरिझम इन द डेव्हलपमेंट ऑफ कोकण’. या संस्थेमार्फत कृषी पर्यटन केंद्र विकसित करणाऱ्यांसाठी सल्ला, मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाते. आता या विषयासाठी लोक पुढे येत असले, तरी २००९ ला त्यासाठी लोकांना मनधरणी करून अथवा ओढून न्यावे लागत असे. कोकणातील चार जिल्ह्यांतील १०० कृषी पर्यटन केंद्रांपैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५० ते ५५ आहेत. मध्यम केंद्र गृहीत धरले, तर त्यासाठी पाच ते दहा एक जागा लागते. तेथे प्रत्यक्ष प्रत्येकी ८ लोकांना रोजगार मिळतो. शिवाय अप्रत्यक्ष रोजगार आहेच. तो वाढण्यासाठी स्थानिक लोकांनी आपली कला, कौशल्य आणि व्यावसायिक शहाणपण वापरावे लागते. या संस्थेचे सध्या ७६ सदस्य चारही जिल्ह्यांत आहेत.

बी.कॉम.च्या अभ्यासक्रमात समावेश
कृषी पर्यटनाने समृद्धी कशी येते यासाठी ओक यांनी तारपा ॲग्रो टुरिझमचे उदाहरण दिले. डहाणूजवळ घोलवड येथे प्रभाकर सावे यांचे सुमारे ३५ एकरवर केंद्र पसरलेले आहे. तेथे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या वर्षी तेथे सुमारे दहा हजारहून अधिक पर्यटक वर्षभरात आले. हा प्रकार विकसित करण्यासाठी आवश्‍यक त्या बाबी तेथे असल्यामुळे प्रशिक्षणासाठी त्याची निवड केली जाते. बी.कॉम.च्या प्रथम वर्षासाठी ‘एन्व्हायर्न्मेंटल स्टडीज्‌’ या विषयांतर्गत केस स्टडी म्हणून ‘ॲग्रो टुरिझम तारपा’ याचा समावेश केला आहे, इतके ते रोल मॉडेल आहे.

Web Title: konkan news agriculture tourism