अंगणवाडी कर्मचारी धडकल्या जिल्हा परिषदेवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मानधन वाढवा; उन्हाळी सुटी एक महिना करण्याची मागणी

रत्नागिरी - ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा घोषणा देत अंगणवाडी कर्मचारी सभेने मानधनासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन मानधनासंदर्भात चर्चा केली. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.

अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण भागात काम करतात. त्यांना हक्‍कासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. शासनाकडून त्यांना मान आणि धनही मिळत नाही. ग्रामीण भागात अनेक अडचणींना तोंड देत घराघरात पोचणाऱ्या या कर्मचाऱ्याचा विचार करण्याएवढी उसंत शासनाकडे नाही. या कर्मचाऱ्यांचे मानधन चार-चार महिने होत नाही. तक्रार निवार सभा तीन महिन्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी, असा शासन निर्णय आहे; परंतु त्याची अंमलबजावणी रत्नागिरीत होत नाही. २०१५ नंतर अशी बैठक जिल्ह्यात झालेली नाही. केंद्र शासनाच्या मानधनवाढीला ६ वर्षे व राज्य शासनाच्या मानधन वाढीला ३ वर्षे लोटली. महिला बालकल्याण कृती समिती समवेत बैठका घेऊन मानधन वाढीचे आश्‍वासन दिले; परंतु अद्याप मानधनवाढ विषयामध्ये हालचाल नाही. 

मानधनवाढ समितीच्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने आर्थिक तरतूद करावी. २०११ पासून आहाराचा दर ४ रुपये ९२ पैसे आहे, तो तिप्पट वाढवावा. सध्या महागाईमुळे दर परवडत नाही. अंगणवाडी कामकाजासाठी लागणारे अहवाल, रजिस्टर सर्व साहित्य शासनाने पुरवावी. आजारपणाची रजा १५ दिवसांनी आणि उन्हाळी सुटी एक महिन्यांची करावी, टीएचआर बंद करून मुले खातील असा आहार दिला जावा आणि अंगणवाड्या भरण्याची वेळ बदलावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली.

संघटनांचे शक्‍तिप्रदर्शन
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २४) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. सलग दुसऱ्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे हजारो कर्मचारी सहभागी असलेला दुसरा मोर्चा काढला. यामध्ये दोन्ही संघटनांकडून शक्‍तिप्रदर्शनच सुरू होते.

Web Title: konkan news anganwadi employee agitation