देवधामापूर येथील पूल धोकादायक स्थितीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

देवरूख - देवरूख- सांगवे मार्गावरील देवधामापूर बसथांब्यानजीक असलेला ३५ वर्षांपूर्वीचा पूल सध्या धोकादायक अवस्थेत उभा आहे. या पुलाच्या तुटलेल्या लोखंडी रेलिंगच्या ठिकाणी बांबू बसविण्यात आले आहेत. गेली पाच वर्षे सातत्याने मागणी करूनही या पुलाकडे दुर्लक्षच होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 

देवरूख - देवरूख- सांगवे मार्गावरील देवधामापूर बसथांब्यानजीक असलेला ३५ वर्षांपूर्वीचा पूल सध्या धोकादायक अवस्थेत उभा आहे. या पुलाच्या तुटलेल्या लोखंडी रेलिंगच्या ठिकाणी बांबू बसविण्यात आले आहेत. गेली पाच वर्षे सातत्याने मागणी करूनही या पुलाकडे दुर्लक्षच होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 

यावर्षीच्या पावसाळ्यात सुदैवाने हा पूल अद्याप तरी सुरक्षित राहिला असला, तरी आगामी सहा महिन्यांत या पुलाला धोका होऊ शकतो. ताम्हाने पचंक्रोशीत मोडणाऱ्या सांगवे गावात जाण्यासाठी कोसुंब - ताम्हाने मार्गे रस्ता आहे. हाच मार्ग पुढे सांगवेतून फणसट या गावात जातोच शिवाय सांगवेतून हा मार्ग बाहेर पडून तो देवरूख-रत्नागिरी मार्गाला तुळसणी विद्यालयाजवळ मिळतो. यामुळे देवरूख-रत्नागिरी मार्गाला पर्याय असलेल्या या मार्गावरूनही रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसफेऱ्या देवरूख आगारातून सुरू आहेत. याशिवाय दिवसाकाठी असंख्य खासगी वाहनेही या मार्गावरून प्रवास करतात. या मार्गाची कोसुंब ते ताम्हाने आणि देवधामापूर ते सांगवे अशा परिसरात दुरवस्था झाली आहे. उखडलेले डांबरीकरण आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे हा मार्ग सध्या चर्चेत असतानाच आता देवधामापूर बसथांब्यानजीक असलेला आणि हा पूलही धोकादायक अवस्थेत उभा आहे. या पुलावरून एकावेळी एकच वाहन जाते इतका तो अरुंद  आहे. पायाकडच्या बाजूने तो धोकादायक बनला आहे. तीन वर्षांपूर्वी या पुलाचा कठडा ढासळला होता. याचे वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने तो कठडा पुन्हा उभारला असला तरी याची गंजलेली रेलिंग बदलणे बांधकाम विभागला जमलेले नाही. गेल्या दोन वर्षात या रेलिंगची दुरवस्था झाली असून ती गंजून तुटून पडली आहेत.  

पुलाच्या एका बाजूचे रेलिंग तुटल्यानंतर तेथे बांबू बांधण्यात आले. पुलाचे चारही संरक्षक कठडे आता धोकादायक बनले आहेत. यातील काही कठडे लाथ मारल्यावरही खाली पडतील असे जीर्ण झाले आहेत. पुलाची उंची २५ फुटांहून अधिक आहे. शिवाय कायम लहान मुलांची वर्दळ सुरू असते. अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण?
- दिनेश सप्रे, ग्रामस्थ, देवधामापूर

Web Title: konkan news bridge