जिल्हा काँग्रेसला मिळणार अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

देवरूख - गेली तीन वर्षे वाली नसलेल्या जिल्हा काँग्रेसला सप्टेंबरमध्ये नवा अध्यक्ष लाभण्याची चिन्हे आहेत. राज्यातील काँग्रेस कमिटीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. ५ ते १५ सप्टेंबर या काळात जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणुका होतील, अशी माहिती प्रवक्‍ते अशोक जाधव यांनी दिली.

देवरूख - गेली तीन वर्षे वाली नसलेल्या जिल्हा काँग्रेसला सप्टेंबरमध्ये नवा अध्यक्ष लाभण्याची चिन्हे आहेत. राज्यातील काँग्रेस कमिटीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. ५ ते १५ सप्टेंबर या काळात जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणुका होतील, अशी माहिती प्रवक्‍ते अशोक जाधव यांनी दिली.

२०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांना राजापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे पक्षाच्या नियमानुसार कीर यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर काहीकाळ या पदाचा भार प्रभारींकडे देण्यात आला होता. त्यानंतर गेली ३ वर्षे हे पद रिक्‍त आहे. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार नीलेश राणेंची वर्णी लागावी यासाठी त्यांच्या समर्थकांसह निष्ठावंतांनीही प्रयत्न केले; मात्र प्रदेश काँग्रेसने याकडे लक्ष दिलेले नाही. उलट राणेंना दुर्लक्षित करण्याची खेळी प्रदेशने अवलंबली. यातून नीलेश राणे यांनी प्रदेश चिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जिल्हाभरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र सुरू केले. यानंतरही नव्या नियुक्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस गलितगात्र झाली होती.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रदेश काँग्रेसने राज्यभरात नवे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. यासाठी पक्षीय स्तरावर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती अशोक जाधव यांनी दिली. यातील तालुकास्तरावरचे पदाधिकारी आणि ब्लॉक अध्यक्ष यांची निवड २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यानंतर ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया होईल. यासाठी पक्षाचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी महेश जोशी यांनी आदेश जारी केले आहेत.

या कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्‍यांच्या कमिट्या नव्याने गठीत होणार असून जिल्हा कार्यकारणीही नव्या दमाने तयार होणार आहे. ही प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी जिल्ह्यातील सक्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक १५ जुलैला सकाळी ११ वाजता चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहात होणार आहे.

Web Title: konkan news congress