निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

वैभववाडी - पंचायत समिती इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. हे संपूर्ण काम निकृष्टच आहे. या इमारतीच्या निकृष्ट कामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती लक्ष्मण रावराणे यांनी आज येथे सांगितले.

वैभववाडी - पंचायत समिती इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. हे संपूर्ण काम निकृष्टच आहे. या इमारतीच्या निकृष्ट कामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती लक्ष्मण रावराणे यांनी आज येथे सांगितले.

गेल्या दोन तीन दिवसांपासुन पंचायत समिती इमारतीला लागलेल्या गळतीमुळे इमारतीच्या दर्जाविषयी चर्चा सुरू आहे. पहिल्याच पावसात इमारतीच्या स्लॅबमधुन कोसळत असलेल्या पाण्याची आज सभापती श्री. रावराणे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, प्रमोद रावराणे, सज्जन रावराणे उपस्थित होते. यावेळी श्री. रावराणे बोलत होते. सभापती श्री. रावराणे म्हणाले, ‘‘संपुर्ण इमारतीची पाहणी केली असता इमारतीच्या स्लॅबमधुन मोठ्या प्रमाणात गळती होताना आढळले. सभापती पदाची धुरा स्विकारल्यानंतर तात्काळ ठेकेदार, अधिकारी यांना कामाचा दर्जा राखण्याविषयी सुचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय ठेकेदाराला तोंडी, लेखी सुचना दिल्या होत्या; परंतु ठेकेदाराने सातत्याने सुचनांकडे दुर्लक्ष केले. ठेकेदारांच्या दुर्लक्षापणामुळे आणि कामाला विलंब होत असल्यामुळे त्याला प्रतिदिन १ हजार रूपये दंड करावा असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. आज इमारतीची पाहणी केल्यानंतर या इमारतीचे काम निकृष्ट असल्याचे दिसत आहे. इमारतीचे काम मुख्य ठेकेदाराने अन्य ठेकेदारांना पोटमक्ताने दिल्याचे निदर्शनास आले आहे.कामाला मुदतवाढ देवुन सुध्दा अजुन काम पुर्ण झालेले नाही. यामुळे या इमारतीच्या कामांची सखोल चौकशी होण्याच्या दृष्टीने आपण ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता यांची भेट घेण्यात येणार आहे. इमारतीच्या निकृष्ट कामाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. ज्या यंत्रणेने चौकशी करून उत्तम काम असल्याचा अहवाल दिला त्या यंत्रणेची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.’’

अडीच कोटी वाया
येथील पंचायत समितीच्या इमारतीकरीता शासनाने २ कोटी ५४ लाख मंजुर केले. या इमारतीच्या कामांची मुदत ऑगस्ट २०१६ होती; परंतु या कालावधीत निम्मे काम देखील न झाल्यामुळे प्रशासनाने कामाला मुदतवाढ दिली. ही वाढवुन दिलेली मुदत सुध्दा लवकरच संपणार आहे; मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात काम शिल्लक आहे. त्यातच इमारतीला लागलेली गळतीमुळे इमारतीवर होत असलेले अडीच कोटी रूपये वाया गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

Web Title: konkan news construction vaibhavwadi