बेलगाम वाहनचालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

चिपळुणात विशेष मोहीम - महिनाभरात पावणेदोन लाख दंड वसुली

चिपळूण - दुचाकीवर तीनजण, नो एंट्रीमधून प्रवास करणे, अगर रस्त्याच्या कडेला कोठेही मोटार उभी करणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.

महिन्याभरात ८०९ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महाविद्यालयाला दांडी मारून अनेक विद्यार्थी दुचाकीवर तीन-तीन जण पावसाळी पर्यटनाला जातात. शहरातही तसेच फिरतात. मोठमोठ्याने दुचाकींचे हॉर्न वाजवित जाणारे हे तरुण रस्त्यावरून जात असलेल्या वाहनचालक व पादचाऱ्यांवर दांडगाई करतात.

अनेकदा महिला, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांना ध्वनी प्रदूषणाबरोबरच अतिवेगाने दुचाकी हाकणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. शहरात विरुद्ध बाजूने ये-जा करणे, तीन-तीन जण बसल्याने तोल सावरताना अडचण, यामुळे अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. यामुळे अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे विशेषत: दुचाकीचालकांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. सरळ जात असलेल्या वाहनचालकांना अनेकदा विरुद्ध बाजूने आलेल्या वाहनचालकांमुळे अपघातांचा सामना करावा लागतो. 

सरळ जात असताना वेग अधिक असल्याने अनेकदा वाहनचालकांना सावरण्याची संधी मिळत नाही. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय 
आजवर ३०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालता प्रवास करणे, लायसन्स नसताना गाडी चालविणे आदी गुन्ह्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू आहे. रस्त्याच्या कडेला कुठेही मोटारी उभ्या करण्याचेही प्रमाण वाढले असून त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत चालली आहे. याचा गांभीर्याने विचार करून वाहतूक पोलिसांनी रस्त्यात गाडी लावणाऱ्यांच्या विरोधातही कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखा चिपळूणचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.

Web Title: konkan news crime on driver