असंस्कृत कृत्याविरुद्धच्या ‘संवेदना’ झाल्या जाग्या

असंस्कृत कृत्याविरुद्धच्या ‘संवेदना’ झाल्या जाग्या

सावंतवाडी - राज्यातील इतर भागांच्या तुलनेत सिंधुदुर्गचा क्राईम रेट कमी असला तरी असलेले प्रमाण सुसंस्कृत अशी ओळख सांगणाऱ्या जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. विशेषतः उगड हप्तेबाजीच्या जोरावर सुरू असलेले मटका, जुगार, दारुअड्डे आणि गोव्यातून जिल्हामार्गे होणारी कोट्यवधीची दारू वाहतूक बऱ्याच काळापासून डोकेदुखी ठरली आहे. सध्याचे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी स्वतः या विरोधातील मोहिमेत उतरून सुसंस्कृत सिंधुदुर्गातील या असंस्कृत कृत्यांविरोधात उचललेल्या पावलामधून संवेदनशीलतेची झुळूक दाखवली आहे. यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सिंधुदुर्गचा क्राईम रेड जास्त नाही. येथे खून, बलात्कार, दरोडे अशा पोलिस दप्तरी गंभीर मानल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी आहे; मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गुन्ह्याची या छोट्याशा जिल्ह्यातील व्याप्ती खूप मोठी आहे. इथे प्रत्येक पंचक्रोशीत किमान एक दारूअड्डा वर्षानुवर्षे चालत आला आहे. मटक्‍याचे नेटवर्क जवळपास प्रत्येक गावापर्यंत पोचले आहे. ‘जिथे एसटी पोचली नाही तिथेही मटका पोहोचलाय’ असे गमतीने म्हटले जाते. या दोन्ही अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

या सगळ्याची कडी म्हणजे सिंधुदुर्ग मार्गे होणारी गोव्यातील दारूची अवैध वाहतूक जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्र तसेच इतरही राज्यात मोठ्या प्रमाणात या दारूची अवैध वाहतूक होते. यातील बरीच दारू बनावट असते. यात कोट्यवधीचा महसूल तर बुडतोच; पण बनावट दारूच्या प्राशनाने कितीजण जीव गमावत आहेत, याचा हिशेबच नाही. सिंधुदुर्गाची सुसंस्कृत अशी ओळख आहे. त्याला हे शोभनीय नाही. हे धंदे थांबविणे पोलिसांच्या दृष्टीने अशक्‍य नक्कीच नाही; मात्र हप्तेबाजी, खाकीतीलच काही अपप्रवृत्तींमुळे अशा गोष्टींना पाठबळ मिळाल्याने हे धंदे चढ-उतार पाहत फोफावत राहिले. यातून असे धंदे चालविणारे जिल्हाभर केडरच तयार झाले. विशेषतः अवैध दारू वाहतूक करणारे ठराविक गुन्हेगारच आहेत. त्यांनाच वारंवार अशा गुन्ह्यात अटक झाल्याचे लक्षात येते. या गुन्हेगारांनाही अशा धंद्याला खाकीमधील कोण पाठीशी घालणार आणि त्याचा ‘रेट’ काय आहे, याची पूर्ण कल्पना असते. यातून हे केडर फैलावले. पोलिस अधीक्षक या स्थितीवर नियंत्रण आणू शकतात याची जाणीव मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या धडाकेबाज कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने आली. त्यांनी स्वतः मैदानात उतरून या धंद्यांना सुरुंग लावले. गुन्हेगारांबरोबरच पोलिस खात्यातील घरभेदींच्या मनात दरारा निर्माण केला. यानंतरच्या काळात डॉ. रवींद्र शिसवे, अभिषेक त्रिमुखे, अमोघ गावकर यांनीही आपल्या स्टाईलने त्यांचाच कित्ता गिरवला. श्री. प्रसन्ना यांचे स्वतःचे नेटवर्क होते. स्वतंत्रपणे, प्रसंगी स्वतः मैदानात उतरुन कारवाईचे त्यांचे धोरण असायचे. डॉ. शिसवे यांनी यंत्रणेत सुधारणे बरोबरच भ्रष्टाचार नियंत्रणासाठी चांगले काम केले. श्री. त्रिमुखे यांचा स्वतः कारवाईपेक्षा पोलिस यंत्रणेत सुधारणेवर भर होता. त्यांनी वर्षानुवर्षे एकाच पोलिस ठाण्यात ठाण मांडून असलेल्यांच्या बदल्या करुन खाकीमधील भाकरी परतण्याचे काम केले. गावकर यांची जिल्ह्यातील अल्प कारकिर्द स्वच्छ होती; मात्र ते स्वतः कारवाईसाठी अभावानेच उतरले. पोलिस यंत्रणेशी समन्वयाची भूमिका ते फार अभावानेच घ्यायचे; मात्र झारीतील शुक्राचार्यांच्या विरोधात त्यांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबले. त्यांच्या किरकिर्दीत बांदा पोलिस ठाण्यातील भ्रष्ट काराभाराविरोधात सर्वाधिक कडक पावले उचलली गेली; पण यंत्रणेत समन्वयाअभावी त्यांचे स्वतःचे खबऱ्यांचे नेटवर्क फार प्रभावी नव्हते. साहाजिकच कमी जास्त प्रमाणात अवैध धंदे सुरुच राहिले. अलिकडच्या काळातील प्रवास पाहता थेट आयपीएस अधिकारी आपल्या इमेजबाबत अधिक जागृक असल्याचे दिसते. इतर काही एसपींची कारकिर्द अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणारीच ठरली. एका एसपींच्या कारकिर्दीत तर आपले धंदे बंद करुन गोव्यासह इतर भागात पोटामागे पळणाऱ्यांना पुन्हा जिल्ह्यात आणून असे धंदे सुरु केले गेल्याचा प्रकारही याच जिल्ह्यात घडला होता.

थेट आयपीएस असलेल्या गेडाम यांच्याकडूनही जिल्हावासियांच्या अपेक्षा होत्या. त्यांनी जिल्ह्यात दाखल होताच अवैध धंदे चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. छापेही पडले. मधल्या काळात मात्र अचानक अवैध धंद्यांनी उचल खाल्ली. राजरोस हप्तेगिरी सुरु झाली. सुरवातीला कडक धोरण अवलंबायचे व हप्ते सुरु करुन घ्यायचे असा खाकीमधील पारंपारिक रिवाज तर श्री. गेडाम यांच्या कारकिर्दीत पहायला मिळणार नाही ना अशी शंका उपस्थित होवू लागली. या वाढलेल्या धंद्यावर सगळ्यात आधी २८ जुलैला सकाळ ने प्रकाशझोत टाकला. यानंतर हा विषय लावून धरला. श्री. गेडाम यांनीही याची दखल घेत अशा धंद्याविरोधात स्वतः कारवाई सुरु केली. यासाठी स्वतंत्र पथक तयार केले. पोलिस यंत्रणेला तंबी देत त्यांना सक्रीय केले.

गेडाम यांनी खाकीच्या आत लपलेल्या संवेदनशीलतेचे यानिमित्ताने दर्शन घडविले. ढिला कारभार करणाऱ्या आणि वादात सापडलेल्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत कारवाईचा बडगा उगारला. यामुळे जिल्हावासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणाऱ्या, पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची उठबस आणि सर्वसामान्य अन्यायग्रस्ताला ‘हडतुड’ करणाऱ्या, अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या घरभेदींना ते चाप लावतील अशी अपेक्षा आता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com