अकरावी प्रवेशासाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

विज्ञानसह वाणिज्यकडे ओढा; पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर होणार

कणकवली - दहावी निकालानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. यात गेले दोन दिवस प्रवेश अर्ज घेण्यासाठी कणकवली महाविद्यालयात विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. सायन्स आणि वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज घेतले आहेत. पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला दुपारी तीन वाजता संबंधित महाविद्यालयात लावली जाणार आहे. 

विज्ञानसह वाणिज्यकडे ओढा; पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर होणार

कणकवली - दहावी निकालानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. यात गेले दोन दिवस प्रवेश अर्ज घेण्यासाठी कणकवली महाविद्यालयात विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. सायन्स आणि वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज घेतले आहेत. पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला दुपारी तीन वाजता संबंधित महाविद्यालयात लावली जाणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची क्षमता १४ हजार ४४० एवढी आहे. तर १२ हजार २८९ एवढे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. यामुळे यंदा अकरावी प्रवेशाची समस्या जिल्ह्यात येणार नाही. परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पहिल्या गुणवत्ता यादीत ९२ ते ९५ टक्‍केपर्यंत गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाच संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावी-बारावीचा निकाल सलग सहा वर्षे राज्यात अव्वल आहे. तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने, अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि दडपण असल्याचे चित्र आहे. आपल्याला शहरातील महाविद्यालयात आणि आवडीच्या शाखेत प्रवेश मिळणार का? याचीच चिंता विद्यार्थी-विद्यार्थीर्नींना सध्या सतावत आहे. 

जिल्ह्यातील महाविद्यालयांत ३० जूनपर्यंत अकरावी प्रवेशाचे अर्ज देणे आणि स्वीकारले जाणार आहेत. १ ते ४ जुलै पर्यंत प्रवेश अर्जांची छाननी, तपासणी केली जाणार आहे.  तसेच गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता कला, वाणिज्य, विज्ञान, आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.  यानंतर प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीवरील उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

अकरावीची प्रवेशाची समस्या नाही
यंदा अकरावीमध्ये १४ हजार ४४० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये कला शाखेत ३९ तुकड्यांमधून ३ हजार ३२०, विज्ञान शाखेत ४४ तुकड्यांमधून ३ हजार ९४०, वाणिज्य शाखेत ४१ तुकड्यांमधून ३ हजार ५०० आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ४२ तुकड्यांमधून ३ हजार ६८० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात १२ हजार २८९ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 

तालुकानिहाय प्रवेश क्षमता
देवगड तालुक्‍यात ९ महाविद्यालये, १ हजार ७६० प्रवेश क्षमता
दोडामार्ग तालुक्‍यात४ महाविद्यालये, ५६० प्रवेश क्षमता
कणकवली तालुक्‍यात १२ महाविद्यालये, २ हजार ५६० प्रवेश क्षमता
कुडाळ तालुक्‍यात १५ महाविद्यालये,  ३ हजार ८० प्रवेश क्षमता
मालवण तालुक्‍यात ९ महाविद्यालये,  १ हजार ४०० प्रवेश क्षमता
सावंतवाडी तालुक्‍यात १५ महाविद्यालये, ३ हजार ८० प्रवेश क्षमता
वैभववाडी तालुक्‍यात ६ महाविद्यालय,  १ हजार १२० प्रवेश क्षमता
वेंगुर्ले तालुक्‍यात ४ महाविद्यालये, ९२० विद्यार्थी क्षमता आहे.

Web Title: konkan news crowd for eleventh admission