सालदुरे समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

दाभोळ/हर्णै  - दापोली तालुक्‍यातील सालदुरे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यातील एक सोलापूरचा असून दुसरा पुण्यातील आहे. 

दाभोळ/हर्णै  - दापोली तालुक्‍यातील सालदुरे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यातील एक सोलापूरचा असून दुसरा पुण्यातील आहे. 

पुणे येथील विनय यक्कलदेवी (पुणे), अशोक नारायण पुजारी (वय 38, रा. सोलापूर) व राजेश सिद्रराम वंगारी (35, रा. पुणे) हे मित्र शनिवारी (ता. 27) दुपारी पुणे-दापोली या गाडीने दापोली येथे पोचले. अशोक पुजारी याचे सोलापूर येथे गाड्यांचे गॅरेज व्यवसाय आहे, तर राजेश वंगारी हा पुण्यात सेतू ऍडव्हरटायझिंग कंपनीत कामाला आहे. त्यांनी सालदुरे येथील एका रिसोर्टमध्ये रूम घेतली होती. आज सकाळी ते दापोली बसस्थानकात आले व त्यांनी 29 जानेवारीचे दुपारी दोनच्या पुणे गाडीचे परतीचे तिकीटही काढले. त्यानंतर ते पुन्हा सालदुरे येथे पोचले व दुपारी 1 वाजता सालदुरे येथील समुद्रात पोहावयास गेले. दुपारी साडेतीनच्या सुमारास अशोक पुजारी व राजेश वंगारी हे पाण्यात बुडू लागले. मात्र विनय यक्कलदेवी यांना पोहता येत असल्याने ते किनाऱ्यावर आले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी समुद्रात जाऊन पुजारी व वंगारी यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र 15 ते 20 मिनिटांनी हे दोघे समुद्राच्या पाण्याच्या लाटांसोबत बाहेर आले. या दोघांना विनय यक्कलदेवी व स्थानिक ग्रामस्थांनी उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून ते मृत झाल्याचे जाहीर केले. अशोक पुजारी (वय 38) व राजेश वंगारी (वय 35) यांच्या पश्‍चात पत्नी व मुले आहेत. दापोली पोलिस ठाण्यात या मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत. पाळंदे येथील युवक अनिल आरेकर, अभिजित भोगले, राहुल तवसाळकर, अभिजित बोरकर, सुदेश तवसाळकर या तरुणांनी मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: konkan news dapoli Saladre sea drowned youth