ऐन गणेशोत्सवातच सातोसेत बत्ती गुल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - गणेशोत्सवात तालुक्‍यातील सातोसे गावात  वीजपुरवठा खंडित असल्याने गाव अंधारात आहे. सणासुदीचे दिवस असूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण मंडळाचे अधिकारी अपयशी ठरल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू केला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. 

गणेश चतुर्थी आणि ईद या सणांच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सर्व प्रशासकीय विभागांची बैठक घेतली होती. तालुक्‍यातील वीज समस्या पाहता खांडेकर यांनी वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना देत गणेशोत्सव काळात सतर्क राहून वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना दिली होती. मात्र, तालुक्‍यातील सातोसे गावात वीजपुरवठा खंडित होऊन तब्बल दोन दिवस होऊनही वीज वितरण विभाग सुशागत असल्याचे चित्र दिसत आहे. गावात गणेश चतुर्थीच्या दिवशी खंडित झालेला वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. गावात घराघरात गणेशाचे आगमन झाल्याने वातावरण आनंदी झाले आहे; मात्र गेले दोन दिवस वीज नसल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, त्याठिकाणी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काम धिम्यागतीने सुरू आहे. याबाबत गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कळगुटकर यांनी संताप व्यक्त केला आहे. सातोसे गावात नेमकी कशामुळे वीज खंडित झाली याचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे वीज वितरण मंडळाचे अधिकारी अमोल राजे यांनी सांगितले. जादा कर्मचारी पाठवण्यात आले असून, आज रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे राजे यांनी सांगितले. 

Web Title: konkan news electricity