सीमेबाबतच्या प्रश्‍नांवर राज्यकर्त्यांनी गंभीर व्हावे

सीमेबाबतच्या प्रश्‍नांवर राज्यकर्त्यांनी गंभीर व्हावे

सावंतवाडी - स्वातंत्र्य टिकविण्यात देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा वाटा मोठा आहे. आताही चीनबरोबर संघर्षाची चाहूल लागली आहे. सैनिक आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करीत नाहीत; पण सीमेवरील हे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्यकर्त्यांनीही तितकेच सक्षम बनायला हवे. हे प्रश्‍न वेळीच सोडविल्यास देशाच्या सुरक्षेच्या आणि पर्यायाने विकासाच्या दृष्टीने खूप पुढे जाता येईल, अशा भावना सिंधुदुर्गातील माजी सैनिकांनी व्यक्त केल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर माजी सैनिकांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया...

सीमेवरचे तंत्रज्ञान आत्याधुनिक आहे. सैनिकांना काही प्रमाणात हायर कमांड मिळाले पाहिजे. हायर कमांड मिळेपर्यंत सीमेवरच्या सैनिकांना वाट पहात बसावे लागते, तोपर्यंत शत्रु हल्ला करुनही मोकळा होतो. याचा विचार करण्यात यावा. सीमेवरच्या काही दहशतवादी कृत्याना काही आपलेच नागरीक आश्रय देतात. संधी पहाताच सैनिकावर तुटुन पडतात. अशा बऱ्याच समस्या आज सैनिकापुढे उभ्या आहेत.
-बाबूराव कविटकर, सांगेली (१९७३- १९८९)

देशातील जवानासमोर आंतकवाद थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. काही देशातील सीमेलगतचे लोकच घुसखोरी करणाऱ्यां दहशतवादींना मदत करीत आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाकिस्तानसारखे देश डोके वर काढत आहेत. स्वतंत्र भारताची घडी विस्कटविण्यासाठी दहशतवाद्याकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी आता पाकिस्तानसोबत युद्ध होणे आवश्‍यक आहे. त्यातुनच पाकिस्तान सारखा देशाची समस्या कमी होईल. 
-हिंदबाळ केळूसकर, मालवण (१९७३-१९८९)

सैनिक आपले घर सोडून सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी जातो. त्यामुळेच आपण येथे आनंदात १५ ऑगस्ट साजरा करतो. सीमेवरचे वादविवाद नेत्यानी सोडवायला हवे. नेत्यांनी सीमेवरील प्रश्‍नांकडे लक्ष घालायला हवे. देशाच्या स्वातंत्र्य टिकून राहण्याची काळजी सैनिकांना असते. सैनिकांना पॉवर द्यावी. एक दहशतवादी ठार केला तरी सैनिकांची चौकशी करण्यात येते. त्याचा सैनिकांना त्रास होतो. यात कुठेतरी बदल करावा.
-भिवा गावडे,  कारीवडे (१९७५-१९९३)

स्वातंत्र्यसैनिकामुळे मिळालेले स्वातंत्र्य सैनिकांमुळे टिकाविण्यास मोठी मदत झाली आहे. सीमेवर रात्रंदिवस गस्त घालणाऱ्या जवानाच्या कार्याची जाण प्रत्येक भारतीयाला असणे महत्वाचे आहे. सैन्यात भरती झाल्यावर सर्वात पहिले आपल्या देशाचे रक्षण करणे हे मोठे आव्हान सैनिकासमोर आहे. आणि ते आव्हान आपला जवान पार पाडत आहे.
-नामदेव चव्हाण,  चौकुळ (१९६२-१९८३)

घुसखोरी, सीमेवर गोळीबार अशा आपत्तीजन्य स्थितीत सैनिकांना मोठी दक्षता घ्यावी लागते. फक्त माजी सैनिक आणि सैनिकाच्या मनातच सीमेवर लढण्याचा इच्छा असून चालत नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनात लढण्याची भावना असली पाहिजे. देशभावनेचे बाळकडू लहान मोठ्या सर्वानाच पाजले गेले पाहिजे.
- दीनानाथ सावंत,  कलंबिस्त (१९७१-१९९९)

आज सीमेवरच्या दुश्‍मनापेक्षाही आतंकवादी, नक्षलवादी याचा धोका आपल्या देशाला उद्‌भत आहे. लोकशाही सरकारचा दबाव आज सीमेवरील सैनिकासमोर असल्यामुळे त्याच्या हातात पूर्ण अधिकार नाही. सीमेवरच्या समस्या सोडविल्या गेल्या पाहिजेत.
-मंगेश गावकर,  आडाळी दोडामार्ग  (१९६२-१९९०)

सीमेवर आपला सैनिक प्राणाची बाजी लावत आहे. चीन पाकिस्तान यासारखे शत्रु भारताचे निर्माण झाले आहे. चीन हा मोठा प्रतिस्पर्धी आहे. याचा विचार करुन चीनच्या मालावर बहिष्कार घालणे हे खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हाच देशातील नागरीकांचा मोठा पाठिंबा सैनिकांना ठरू शकतो. आम्हा शत्रुने मोठा त्रास दिलेला आहे. चीन सारख्या देशातील वस्तू हा कुचकामी स्वरूपाच्या असतात त्याच्या वापरावर कायमस्वरुपी बहिष्कार घालावा. माजी सैनिक असलो तरी आजही मी चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध झाले तरी रायफल घेवून युद्धाला जायला तयार आहे.
-तानाजी भोळे, दोडामार्ग (१९६२-१९७७)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com