भातशेती लवकर तयार झाल्याने शेतकरी चिंतेत
देवरुख - गणपती बाप्पाच्या कृपेने यावर्षी तालुक्यात पावसाचा जोर कायम असतानाच संगमेश्वर तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी भातशेती तयार झाली आहे. मुदतीपूर्वीच शेती तयार झाली असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
देवरुख - गणपती बाप्पाच्या कृपेने यावर्षी तालुक्यात पावसाचा जोर कायम असतानाच संगमेश्वर तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी भातशेती तयार झाली आहे. मुदतीपूर्वीच शेती तयार झाली असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिल्याने भातशेतीची कामे वेळीच मार्गी लागली. त्यामुळे या वेळी शेती उत्तम पिकणार अशा अपेक्षेत शेतकरी होते. बहुतेक शेतकरी सरकारी बियाण्यांचा वापर करतात. सरकारी बियाणी ही पिकाला चांगली असल्याने व ठराविक दिवसात तयार होणारी म्हणून या बियाण्यांचा जास्त वापर होऊ लागला आहे. कोकणात पाऊस जास्त पडत असल्याने लवकर तयार होणारी बियाणी शेतकरी नाकारत असल्याचे दिसून येते.
तालुक्यातील फणसवणे वाडावेसराड येथील प्रगतिशील शेतकरी सुधीर शांताराम पावसकर यांनी जया हे भात बियाणे आणून पेरले व त्याची लावणीही वेळेत केली. या बियाण्यापासून ९० दिवसांनी पीक तयार होते. त्यामुळे लावल्यापासून दसऱ्या पर्यंत भात तयार होइल अशी त्यांची अपेक्षा होती. पिकावर लोंबी धरल्या की तोपर्यंत पाऊस जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती.
मात्र सुधीर यांची भातशेती मुदतीपूर्वीच तयार झाल्याने व पावसाच्या जोरदार तडाख्याने आता पावसस्कर यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाचा वाढता जोर, रानटी प्राण्यांचा उपद्रव यामुळे पीक हाती येईल की नाही या चिंतेत पावसकर आहेत. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी तालुक्यातील पूर्वेला अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भात तयार होऊ लागले आहे.
या काळात शेतीला किरकोळ पाऊस लागतो. मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने निसर्गाने दिलेले पीक निसर्गच नेणार की काय या चिंतेत शेतकरी बाप्पाला पीक वाचवण्याचे साकडे घालत आहेत.