जिल्ह्यात चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची वर्दळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

दोडामार्ग - मान्सूनने सिंधुदुर्गात पाऊल ठेवले आणि चढणीचे मासे पकडणाऱ्या मत्स्यखवय्यांची पावले नदी, ओहोळाकडे वळू लागली. नदीकाठ मासेमारी करणाऱ्यांच्या गर्दीने फुलत आहेत.

दोडामार्ग - मान्सूनने सिंधुदुर्गात पाऊल ठेवले आणि चढणीचे मासे पकडणाऱ्या मत्स्यखवय्यांची पावले नदी, ओहोळाकडे वळू लागली. नदीकाठ मासेमारी करणाऱ्यांच्या गर्दीने फुलत आहेत.

मत्स्यप्रजातींसाठी सध्याचा काळ प्रजननाचा आहे. या काळात मासे अंडी देतात. त्यासाठी त्यांचा प्रवास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुरू असतो. मासे खालून वरच्या दिशेने जातात म्हणून त्यांना मासे चढले, असे म्हणतात. त्यामुळेच चढणीचे व उतरणीचे मासे असा शब्दप्रयोग केला जातो. पावसाच्या सुरवातीला नदी-नाले दुथडी भरून वाहू लागतात तेव्हा मासे चढतात आणि नदीनाले कोरडे पडू लागले की ते उतरतात आणि अधिक पाणी असलेल्या सुरक्षित भागात जातात. साधारणपणे माशांचा उतरणीचा प्रवास उत्तरा नक्षत्रात तर चढणीचा प्रवास मृग नक्षत्रात असतो. वर्षानुवर्षांचा माशांचा प्रवास प्रत्येक पिढीला ज्ञात झाल्याने दोन्ही वेळेला खवय्ये मासे पकडण्यासाठी नदी- नाल्यांवर गर्दी करतात. वेगवेगळी जाळी वापरून मासे पकडले जातात. भरपूर पाऊस पडला, की शेतजमिनीतही पाणी साचते. ते पाणी ओहोळाच्या, नदीच्या दिशेने वाहू लागले की, नदी-ओहोळातील मासे शेतजमिनीतील कुणग्यामध्येही येतात. तेथेही अनेकजण मासेमारी करतात. गोड्या पाण्यातील या मासेमारीदरम्यान खेकडे, टोळ, मळवे, काडय, ठिगूर, मरळ, वाळय, खवळे, फुरडे, शेंगडे, अळय अशा प्रकारचे मासे मिळतात. अनेकांना मासे खाण्यापेक्षा मासे पकडण्याची व पकडताना बघण्याची मोठी हौस असते. त्यामुळे पहिल्या पावसात ठिकठिकाणचे पाणवठे अशा हौशा-नौशांनी फुलून गेलेले असतात. सध्या सिंधुदुर्गातील गावागावांत, रस्तोरस्ती असे चित्र नक्की दिसते.

Web Title: konkan news fish rain