मच्छीमारांचा आता आरपार लढा

मच्छीमारांचा आता आरपार लढा

मालवण - जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या अनधिकृत पर्ससिननेच्या मासेमारीमुळे संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आता आणखीनच आक्रमक होत आर या पारची लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या हद्दीत पर्ससीननेटच्या नौका दिसून आल्यास कायद्याची तमा न बाळगता त्या नौका पारंपरिक मच्छीमार पकडून किनाऱ्यावर आणतील, असा ठराव आज झालेल्या जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांच्या बैठकीत करण्यात आला. 

शहरातील धुरीवाडा येथील संस्कार सभागृहात पारंपरिक मच्छीमारांची बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष दिलीप घारे, रमेश धुरी, भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, दत्ताराम रेडकर, भाई खोबरेकर, नारायण कुबल, गंगाराम आडकर, संजय केळुसकर, आकांक्षा कांदळगावकर, अन्वय प्रभू, बाबा मोंडकर, अशोक सावंत, अमित इब्रामपूरकर, विनोद सांडव, श्री. वस्त, हेमंत गिरप, धर्माजी आडकर आदी उपस्थित होते.

या वेळी दत्ताराम रेडकर म्हणाले, ‘‘गेली काही वर्षे पर्ससीनधारक वेगवेगळे शब्द वापरून पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. पारंपरिक मच्छीमारांनी आतापर्यंत सनदशीर मार्गाने लढा दिला आहे; परंतु पालकमंत्री दीपक केसरकर हे पालकत्वाची भूमिका विसरले आहेत. पारंपरिक मच्छीमारांनी त्यांना पालकत्वाच्या भूमिकेची जाणीव करून द्यायला हवी. जोपर्यंत शासनस्तरावर  पारंपरिक मच्छीमार दबाव आणत नाहीत तोपर्यंत पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळणार नाही.’’

काँग्रेसचे अशोक सावंत म्हणाले, ‘‘गेली ३३ वर्षे आपण पारंपरिक मच्छीमारांच्या सुख दु:खात सामील झालो आहोत. त्यांच्या अनेक समस्यांच्यावेळी आपण धावून गेलो आहे. पारंपरिक मासेमारी बंद पडली तर जिल्ह्यातील बाजारपेठा ओस पडतील. पारंपरिक मासेमारीमुळेच आज जिल्ह्यातील बाजारपेठा टिकल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांसोबत आपण कायम राहणार आहे.’’

यावेळी अन्वय प्रभू म्हणाले, ‘‘आतापर्यंत पारंपरिक मच्छीमारांनी संघर्ष करूनच न्याय मिळवला आहे. अजूनही संघर्ष करण्याची वेळ आली तर याला पारंपरिक मच्छीमार तयार आहेत. मच्छीमार समाजाची तरुण पिढीही या संघर्षात पुढे राहील. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पर्ससीनबाबत जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका होती की वैयक्‍तिक हे त्यांनी स्पष्ट करावे. पारंपरिक मच्छीमारांनी आतापर्यंत भल्याभल्यांना पाणी पाजले आहे. त्यामुळे प्रमोद जठार, राजन तेली हे आमच्या समोर किस झाड की पत्ती आहे.’’

बाबा मोंडकर म्हणाले, ‘‘पालकमंत्री दीपक केसरकर हे मासेमारीबाबत समन्वयाची भूमिका घेतात. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेबाबत शिवसेना गप्प का? पर्ससीन मासेमारी हा एक प्रकारचा दहशतवाद आहे. पालकमंत्री केसरकर, प्रमोद जठार, काका कुडाळकर, राजन तेली हे चौघेही जण या दहशतवादाचे मास्टरमाईंड आहेत.’’

पारंपरिक मच्छीमार नेते दिलीप घारे म्हणाले, ‘‘पर्ससीननेटच्या मासेमारीवर निर्बंध आणणारी जी अधिसूचना पारित झाली त्याचे सारे श्रेय जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांना आहे. स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष दोन महिन्यात उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर दोन स्पीड बोटीही लवकरात लवकर उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.’’ पर्ससीन मासेमारीची दुष्परिणाम सर्वांनी पाहिले आहेत. अनधिकृत पर्ससीननेटची मासेमारी रोखण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यायला हवा. यासाठी पारंपरिक मच्छीमारांनी एक कमिटी तयार करून मुख्यमंत्र्यांची भेट घेणे आवश्‍यक असल्याचे ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप घारे यांचा पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

तोरसकर यांचे आंदोलन स्थगित
अनधिकृत मासेमारीवर कारवाई होत नसल्याने मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी उद्या (ता. १५) वेंगुर्ले येथील समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता; परंतु पारंपरिक मच्छीमारांनी केलेल्या विनंतीनुसार तोरसकर यांनी जलसमाधी घेण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे या वेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com