बंदीपूर्वीच मच्छीमारी नौका लागल्या किनारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

दाभोळ - १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीच्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीच्या हालचाली दापोली तालुक्‍यातील हर्णे बंदरात सुरू झाल्या असून, मच्छीमारांनी नौका किनाऱ्यांवर आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व शाकारणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. गेले दोन दिवस झालेल्या वादळी वारे व पावसामुळे मच्छीमारांची तारांबळ उडाली आहे.

दापोली तालुक्‍यातील हर्णै बंदरात सध्या मासेमारी नौका किनाऱ्यावर ओढल्या असून, ट्रॅक्‍टरच्या साह्याने नौका समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात येत आहेत. काही नौका आंजर्ले खाडी, दाभोळ खाडी किनारी शाकारणीसाठी नेण्यात आल्या आहेत. हर्णै बंदरात हर्णैसह पाजपंढरी, आडे, उटंबर, केळशी, दाभोळ, कोळथरे, पंचनदी, बुरोंडी, अडखळ  अशा १० गावात नौकेद्वारे मासेमारी चालते. सुमारे ८०० नौका या बंदरात दररोज मासळी उतरवतात. १० महिने चालणाऱ्या येथील मत्स्य व्यवसायावर संपूर्ण समुद्रकिनारी असणाऱ्या गावांचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे येथील मत्स्य व्यवसायातील चढ-उतारावर सर्वांचेच लक्ष असते.

आता मासेमारी बंदीचा कालावधी ४७ वरून ६१ दिवस पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला किनारपट्टीवरील सर्व राज्यांनी सहमती दिल्यानंतर पश्‍चिम किनारपट्टीवरील राज्यांनी ३१ जुलै, तर पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी १४ जूनला मासेमारी बंदीचा अखेरचा दिवस ठरवला आहे.

आपल्याकडे ७ जून ही पावसाची अंदाजित वेळ असली, तरी ३१ मेनंतर वादळी वारे, पाऊस केव्हाही धडकू शकतो. त्या पार्श्वभूमीवर या बंदीमुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळली जाईल. तसेच प्रजननानंतर माशांच्या पिल्लांची योग्य वाढ होऊन पुढील हंगामात मुबलक मासळी उपलब्ध व्हावी, हा उद्देश पूर्ण होईल.
- अनंत पाटील, अध्यक्ष, दापोली तालुका मच्छीमार संघ

Web Title: konkan news fishing fisherman