मोजक्‍याच नौका दर्यात...

राधेश लिंगायत
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

हर्णै - शासनाच्या नियमाप्रमाणे मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) मासेमारी सुरू झाली. मात्र, दापोली तालुक्‍यातील महत्त्वाच्या हर्णै बंदरातून मोजक्‍याच नौका मासेमारीकरिता गेल्या. बंदरात मासेमारी उद्योगावर अवलंबून असणाऱ्या सहाय्यभूत उद्योगांचीदेखील लगबग सुरू झाली.  

हर्णै - शासनाच्या नियमाप्रमाणे मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) मासेमारी सुरू झाली. मात्र, दापोली तालुक्‍यातील महत्त्वाच्या हर्णै बंदरातून मोजक्‍याच नौका मासेमारीकरिता गेल्या. बंदरात मासेमारी उद्योगावर अवलंबून असणाऱ्या सहाय्यभूत उद्योगांचीदेखील लगबग सुरू झाली.  

मच्छीमार १ ऑगस्टला मासेमारीचा मुहूर्त करतात. त्यासाठी अत्यंत मोजक्‍या नौका दर्यात गेल्या. बहुतांशी नौका आंजर्ले खाडीमध्ये असतात. त्यामुळे काही नौकांनी हर्णै बंदरात न येता थेट आंजर्ले खाडीतूनच मासेमारीचा मुहूर्त साधला. आठवडाभर बर्फ भरणे, डिझेल भरणे, जाळी तयार करणे, खलाशांना लागणाऱ्या अन्नधान्याचे सामान भरणे, मशिनरीची डागडुजी, रंगरंगोटी आदीत मच्छीमार गुंतले होते. अजूनही बहुतेक नौकामालकांची याच कामांची लगबग सुरू आहे. मंगळवारी बंदरात बर्फ कारखाने, डिझेल वाटप, धान्याची दुकाने, मासळीचे डेपो हे व्यवसाय सुरू झाले.

गेल्यावर्षी या कालावधीमध्ये भरपूर पाऊस होता. वातावरणही चांगले नव्हते. त्यामुळे मच्छीमारांनी मुहूर्त न करता १५ ऑगस्टनंतरच नौका पाण्यात लोटल्या, काहींनी तर गणपती उत्सवानंतर मुहूर्त केला. यावर्षी मात्र वातावरण पोषक असल्यामुळे मच्छीमारांनी गणपती सणापर्यंत मिळेल तेवढी मच्छी साधायची असा निर्णय घेतला, तर काहींनी पौर्णिमेच्या उधाणानंतर मासेमारीकरता जाण्याचे ठरवले आहे.

पापलेट, कोळंबी मिळण्याची आशा
गणपतीआधी होणाऱ्या मासेमारी उद्योगामध्ये नौकामालक आणि खलाशी यांच्यामध्ये भागीदारी असते, तसेच या काळात पापलेट, बग्गा, कोळंबी आदी प्रकारची मच्छी चांगल्या प्रमाणात मिळण्याची शक्‍यता असते. त्यामुळे भले वातावरण बिघडले तरी मच्छीमारांनी धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. त्यात गणपती उत्सव लवकरच असल्याने यावर्षी फक्त १५ ते २० च दिवसच गणपतीपूर्वी मासेमारी होईल.

सध्याचे वातावरण मासेमारीला धोकादायक नाही. त्यामुळे आम्ही येत्या दोन दिवसांत नौका पाण्यात लोटणार आहोत. यावर्षी गणपती लवकर असल्याने कमी दिवस आधी मिळत आहेत. आज खूप कमी नौका मासेमारीकरिता गेल्या असल्या, तरी येत्या दोन-तीन दिवसांत बहुतेक नौका दर्यात जातील.
- अंकुश दोरकुळकर, मच्छीमार, पाजपंढरी

Web Title: konkan news fishing harne