...आता महामार्गावर करणार अंत्यसंस्कार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सावर्डे - चिपळूण तालुक्‍यातील असुर्डे गावातील सात वाड्यांसाठी एकच स्मशानभूमी आहे. तेथील रस्ता गेली २१ वर्षे वादात आहे. गावच्या मालकीची २० गुंठे जागा स्मशानासाठी राखीव ठेवली आहे; परंतु तेथे जाण्यासाठी रस्ताच मिळत नाही. गावातील सात वाड्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता  मिळत नसल्यामुळे आक्रमक झाल्या आहेत. आता रस्ता मिळाला नाही तर महामार्गावर सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

असुर्डे सुमारे तीन हजार लोकसंख्याचे बारा वाड्यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचे गाव आहे. मात्र गावातील बौद्ध, चर्मकार, गुरव, चौगले, खापरे, जांभूळ व पाष्टे या सात वाड्यांतील ग्रामस्थांना त्यांच्या वाडीत कोणी मृत्युमुखी पडल्यास वाडीतील मृतदेह स्मशानभूमीपर्यंत कसा आणि कोठून न्यायचा असा प्रश्‍न भेडसावत आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अंत्ययात्रा नेण्यास काहीजणांकडून मनाई केली जाते, असे ग्रामस्थांनी सांगितले. आम्हाला स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हक्काचा आणि पारंपरिक वहिवाट असलेला रस्ता हवा, असा ठराव ग्रामसभेत झाला; मात्र त्यालाही जुमानले जात नाही. यापूर्वी ३५८ ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण ऑक्‍टोबर २०१५ मध्ये चिपळूण तहसीलदारांकडे पाठवले. तहसीलदारांनी याची पाहणी करण्यास गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले; मात्र तसे कोणतेही पत्र आलेच नाही, असे तत्कालीन चिपळूण गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ चौकशी करण्यासाठी असुर्डे ग्रामस्थांना पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. बौद्धजन समाज सेवा मंडळाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्याला यश मिळाले नाही. यामुळे ग्रामस्थांत नाराजी वाढली आहे. त्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.

स्मशानभूमीकडे जाणारा पारंपरिक रस्ता गेली २० वर्षे अडविला जातो. मृतदेह स्मशानाकडे नेणे रोखले जाते. जिल्हाधिकारी ते गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात फेऱ्या मारून न्याय मिळाला नाही. आता गावातील सात वाड्यांमध्ये एखादी व्यक्ती मयत झाल्यास महामार्गावर सरण रचून तो रोखू. तेव्हा प्रशासनाला जाग येईल.
- संजय जाधव, अध्यक्ष- बौद्धजन समाज सेवा संघ, असुर्डे

Web Title: konkan news funeral will now be done on the highway