गणेशोत्सवासाठी वाहतूक नियोजन सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

सिंधुदुर्गनगरी - कोकणपट्टीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गासह राज्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतूक व्यवस्था सुरळीत व अपघातविरहीत पार पडावी याच्या पूर्वतयारीच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी महामार्ग पोलिस परिक्षेत्र ठाणेच्या पोलिस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी आज जिल्हा दौरा केला. त्यांनी दौऱ्यात महामार्ग पोलिसांना विविध सूचना केल्या.

गणेशोत्सवाला २५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. सणासाठी मुंबई-पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. गणेशोत्सवापूर्वी आठ दिवस अगोदरपासूनच महामार्गावरील वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ होते. त्यामुळे काही शहरांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्‍वभूमीवर महामार्ग पोलिस परिक्षेत्र ठाणेच्या पोलिस अधीक्षक अंबुरे यांनी जिल्ह्यात दाखल होत येथील वाहतूक पोलिस प्रशासनाच्या कारभाराची तपासणी केली. त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत घ्यावयाची काळजी व वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबतचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यांनी जिल्ह्यात वाहतूक पोलिस सेंटरना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी रत्नागिरीचे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, तसेच सिंधुदुर्गचे महामार्ग पोलिस सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पालव उपस्थित होते.

Web Title: konkan news ganeshotsav traffic