गोव्याची सॅक संस्कृती सिंधुदुर्गात येणार नाही ना?

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 22 जून 2017

गोव्यातील बहुसंख्य तारांकित हॉटेल किनाऱ्यापासून दूर आहेत. त्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंच्या दराच्या तुलनेत सॅकमध्ये स्वस्ताई आहे. असे असलेतरी बऱ्याचशा सॅक परदेशी पर्यटकांचा अमली पदार्थांचा अड्डा बनल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबवत्सल पर्यटकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही.
 

गोव्यातील बहुसंख्य तारांकित हॉटेल किनाऱ्यापासून दूर आहेत. त्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंच्या दराच्या तुलनेत सॅकमध्ये स्वस्ताई आहे. असे असलेतरी बऱ्याचशा सॅक परदेशी पर्यटकांचा अमली पदार्थांचा अड्डा बनल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबवत्सल पर्यटकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही.
 

सावंतवाडी - सिंधुदुर्गासह कोकणात बीच सॅक संस्कृती आणण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवरील या नव्या संस्कृतीतून थेट किनारा पर्यटनासाठी खुला होणार आहे. यातून पर्यटन वाढीला चालना मिळणार असली तरी यानिमित्ताने गोव्यासारखी सॅक संस्कृती येथे येणार नाही ना? याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

सिंधुदुर्गासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनाऱ्यावर सॅक, हटस्‌, अंब्रेला उभारण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोव्याच्या धर्तीवर हा नवा निर्णय जारी झाला. यात तारकर्ली, आरवली, शिरोडा या किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातील शिरोडा व आरवली हे दोन्ही किनारे गोव्याच्या सीमेवर आहेत. या निर्णयामुळे किनाऱ्यापासून कमी अंतरावर पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतील. त्याला सीआरझेडचा अडथळा येणार नाही. यातून किनाऱ्यावरील पर्यटनाला नवी ओळख मिळणार आहे. असे असलेतरी गोव्याच्या सॅक संस्कृतीचे ड्युप्लीकेशन झाल्यास कोकणातील सुसंस्कृत पर्यटन अडचणीत येण्याची भीती आहे.

गोव्यात गेली दहा वर्षे सॅक टुरिझम सुरू आहे. सीआरझेडमुळे किनाऱ्यापासून जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. साहजिकच हॉटेल्स व पर्यटनासाठी इतर सुविधा थेट किनाऱ्यावर उभारायला मर्यादा होत्या. २००१ मध्ये सीआरझेडमध्ये बदल केला. त्यात पर्यटनासाठी किनाऱ्यापासून दीडशे ते दोनशे मीटर या ना विकास क्षेत्रात (नो डेव्हलपमेंट झोन) तात्पुरत्या स्वरुपातील व्यावसायिक कारणासाठी झोपड्या उभारण्यास परवानगी दिली. तेव्हापासून गोव्याच्या किनाऱ्यावर अशा झोपड्या उभारल्या जाऊ लागल्या. २००३ मध्ये गोव्याच्या पर्यटन विभागाने याला अधिकृत मान्यता दिली.

सॅकसाठी वेगळे धोरण ठरविले. यात लॉटरी पद्धतीने आणि स्थानिकांना प्राधान्य देऊन सॅक बांधण्यास परवानगी देण्यात येऊ लागली आहे. एका व्यक्तीला तीन वर्षांसाठी ही परवानगी दिली जाते. यानंतर त्याचा परवाना रद्द होतो.

१ ऑक्‍टोबर ते ३१ मे या काळात ही सॅक व्यावसायिक वापरासाठी चालविली जाते. पावसाळ्यात मात्र ती चालवता येत नाही. सांडपाणी, मलमुत्र विसर्जन यासाठी व्यवस्था करावी लागते. या सॅकमध्ये दारू विक्रीसाठीही तात्पुरते परवाने दिले जातात.

सुरवातीच्या काळात स्थानिकांनी या सॅक चालविल्या. नंतर मात्र स्थानिकांच्या नावावर परवाने घेऊन परदेशी व्यक्ती या सॅक चालवू लागल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हळूहळू हे सॅक म्हणजे अमली पदार्थांचा अड्डा बनत गेला. गेल्या पाच-सहा वर्षात गोव्यात दोन परदेशी तरुणींचा खून झाला. या दोन्ही घटना सॅक संस्कृतीशी निगडीत होत्या. यामुळे या सॅककडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

गोव्यातील बहुसंख्य तारांकीत हॉटेल किनाऱ्यापासून दूर आहेत. त्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंच्या दराच्या तुलनेत सॅकमध्ये स्वस्ताई आहे. असे असलेतरी बऱ्याचश्‍या सॅक परदेशी पर्यटकांचा अमली पदार्थांचा अड्डा बनल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबवत्सल पर्यटकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. कोकणातही १ सप्टेंबर ते ३१ मे या काळासाठी सॅक ला परवानगी दिली जाणार आहे. सॅकचे परवाने देतांना त्याचा स्थानिकांना फायदा लक्षात घ्यायला हवा. यातून पर्यटकांची लूट होणार नाही असेही धोरण ठरवायला हवे. हा खरेतर स्वागतार्ह निर्णय आहे; मात्र त्याची अमलबजावणी ‘एमटीडीसीच्या’ टिपीकल सरकारी पद्धतीने झाली तर त्याचा फारसा फायदा होताना कठीण आहे. या बरोबरच कोकणच्या सॅक संस्कृतीची सुसंस्कृत ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनेही धोरण ठरविले जाणे आवश्‍यक आहे.

Web Title: konkan news goa's culture will not come in Sindhudurga?