नेमेची गळती; ‘खेम’ची अवस्था!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

दाभोळ - दरवर्षी जुलै महिना उजाडला की हर्णै येथील खेम धरणाला लागलेल्या गळतीवरून अनेकांना राजकीय जाग येते व पावसाळा संपल्यावर हा प्रश्‍न विरून जातो. हा अनुभव येथील ग्रामस्थ गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ घेत आहेत. या धरणाची दुरुस्ती नक्‍की कधी करणार याबाबत अद्याप एकाही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे अथवा शासकीय यंत्रणेचे एकमत होत नाही. यामुळे ‘नेमेची येतो मग पावसाळा...’ प्रमाणे ‘नेमेची गळती खेम धरणाची’ अशी अवस्था झाली आहे.

दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील खेम धरण १९८५ मध्ये बांधण्यात आले. या धरणाच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने हर्णै व पाजपंढरी या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी होतो; मात्र या दोन्ही गावांमधील लोकसंख्या वाढीमुळे या धरणातील पाणी पुरत नाही. दापोली येथील जोग नदीवर बांधतिवरे येथे बंधारा बांधून तेथून पाणी हर्णै व पाजपंढरीला पुरविले जाते. 

हे धरण उभारले जात होते तेव्हापासूनच वादात असून या धरणाचे बांधकाम सदोष झाल्याने काही वर्षांतच या धरणाला गळती लागली आहे. २००७ मध्ये या धरणाच्या गळतीला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून अंदाजपत्रक करण्यात आले होते. त्यानंतर २०१६ मध्येही या धरणाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. या धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठीही आदेश काढण्यात आले होते; मात्र अद्यापही या धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. त्यासाठीही निधीची वानवा असल्याचे जिल्हा परिषदेकडून दरवेळी सांगण्यात येते. गेली १० ते १५ वर्षे पावसाळा सुरू झाला की, खेम धरणाला गळती लागली असून खेम धरण फुटण्याची शक्‍यता आहे, धोका आहे, अशी चर्चा जोरात सुरू होती. याबाबत काही जणांना राजकीय जागही येते; मात्र ही गळती रोखण्यासाठी निधी किती आणला व कसा आणणार याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. 

आमदार संजय कदम भेट देणार
यावर्षीही काही राजकीय नेत्यांनी या धरणाला भेट देऊन या धरणाची दुरुस्ती करणार, असे आश्‍वासन दिले आहे. शुक्रवारी (ता. १४) अधिकाऱ्यांसोबत या धरणाची पाहणी करून धरणातील गाळ काढण्याबरोबरच दुरुस्तीसंदर्भातही अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले. या भेटीनंतर काय होते, ते लवकरच कळेल.

Web Title: konkan news khem dam