‘कोकण भूरत्न’ भुईमुगाचे नवे वाण विकसित

रत्नागिरी - ‘कोकण भूरत्न’ भुईमुगाचे वाण
रत्नागिरी - ‘कोकण भूरत्न’ भुईमुगाचे वाण

कृषी संशोधन केंद्रात संशोधन - प्रतिहेक्‍टर २५ ते ३० क्विंटल उत्पादन

रत्नागिरी - कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्र येथे २००९ पासून राष्ट्रीयस्तरावरील भुईमूग संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या केंद्राने भुईमुगाच्या ‘कोकण टपोरा’ व ‘कोकण गौरव’ दोन जाती विकसित केल्यानंतर आता ‘कोकण भूरत्न‘ हे भुईमुगाचे वाण विकसित केले आहे.

येथील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात हे वरदान ठरेल, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. 

कृषी संशोधन केंद्रातून सखोल संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या ‘कोकण भूरत्न‘ हे वाण उपट्या प्रकारातील आहे. वाणाच्या बारीकबारीक मुळावर गोल आकारात भुईमूग शेंगा तयार येतात. एका वाणास पंच्याहत्तर ते शंभर शेंगा लागतात. सर्व शेंगा पक्वतेचा कालावधी सारखा आहे.

भुईमुगाचे वाण पीबीसी २४०३० बाय जीपीबीडी ४ यांच्या संकरातून आणि वंशावळ पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. भूरत्न वाण मध्यम कालावधीचे तसेच ११५ ते १२० दिवसात तयार होणारे आहे. या वाणातून सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रतिहेक्‍टर उत्पादन देणारे आहे. वाणामध्ये ५०.०१ टक्के तेलाचे प्रमाण आहे. २३.४४ टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. दाण्याचा उतारा खरीपमध्ये ७३.५ ते ७६ टक्के आणि रब्बीमध्ये ७०.२ ते ७६ .३ टक्के. शेंगदाणा मध्यम जाडा प्रकारातील आहे. भुईमुगावरील लवकर व उशिरा येणारा टिक्का, तांबेरा, विषाणूजन्य शेंडमर, करपा या रोगास व फुलकिडे, तुडतुडे, पाने खाणारी अळी या किडीस हे वाण प्रतिकारक आहे. भूरत्न वाण कोकण विभागात खरीपामध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या वरकस जमिनीसाठी व रब्बीमध्ये ओलिताखालील क्षेत्राकरिता लागवडीस शिफारस करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कोकणातील हलकी भुसभुशीत जमीन, जमिनीतील पोटॅशचे अधिक प्रमाण ३०-३५ अंश से. पेक्षा कमी तापमान हवामानातील जास्त आर्द्रता भुईमूग पिकास अतिशय पोषक आहे. त्या दृष्टीने भुईमूग पिकाबाबत संशोधन, बीजोत्पादन, प्रशिक्षण या केंद्रामार्फत करण्यात येते.

देशातील २३२ भुईमुगाचे वाण केंद्रावर आणून कोकणातील वातावरणात चाचणी घेतली जाते. वेगवेगळ्या गुणधर्मासाठी अभ्यास केला जातो. निवडक जातीचे संकर करून येथील जमीन हवामानास योग्य असणाऱ्या जाती निर्माण करण्याचे कार्य प्रगतिप्रथावर आहे. संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून भुईमूग पिकाचे प्रथमदर्शीय पीक प्रात्यक्षिके घेण्यात येतात. कोकणामध्ये हळव्या भात जातीच्या क्षेत्रामध्ये भातापेक्षा दुप्पट ते तिप्पट अधिक उत्पन्न देते. तसेच रब्बीमध्ये भात-भुईमूग ही पीक पद्धती कोकणात सर्वात फायदेशीर ठरली आहे.
- डॉ. भरत वाघमोडे, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव

दृष्टीक्षेप...
११५ ते १२० दिवसांत तयार

एका वाणास ७५ ते १०० शेंगा
अळी, किडीस प्रतिकारक

कोकणासाठी शिफारस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com