गणेशोत्सवाच्या विशेष गाड्यांना दुजाभाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या गणेशोत्सव विशेष गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. या गाड्यांना उशिरा सोडणे, वारंवार क्रॉसिंगचे थांबे देणे यांमुळे आठ तासांच्या प्रवासासाठी पंधरा ते वीस तास विलंब होत आहे. दरम्यान, आजही (ता. दोन) गणेशोत्सव विशेष गाड्या पाच ते आठ तास विलंबाने धावत होत्या. 

कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या गणेशोत्सव विशेष गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. या गाड्यांना उशिरा सोडणे, वारंवार क्रॉसिंगचे थांबे देणे यांमुळे आठ तासांच्या प्रवासासाठी पंधरा ते वीस तास विलंब होत आहे. दरम्यान, आजही (ता. दोन) गणेशोत्सव विशेष गाड्या पाच ते आठ तास विलंबाने धावत होत्या. 

कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग आणि मुंबईतील अतिवृष्टीचा मोठा फटका गणेशोत्सव विशेष गाड्यांना बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या, मांडवी, तुतारी एक्‍स्प्रेस, दिवा पॅसेंजर या गाड्या गेल्या दोन दिवसांपासून नियमित वेळापत्रकानुसार सोडल्या जात आहेत. तर गणेशोत्सव विशेष गाड्या मात्र विलंबाने सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. 

मुंबईला आज जाणाऱ्या गणेशोत्सव विशेष गाड्यांमध्ये सावंतवाडी-करमळी ही गाडी तब्बल पाच तास विलंबाने रवाना झाली. सावंतवाडी-दादर ही गाडी तीन तास विलंबाने धावत होती. याखेरीज सावंतवाडी-पनवेल दोन तास, बांद्रा-करमळी स्पेशल अडीच तास तर एलटीटी सांवतवाडी ही गाडी तीन तास विलंबाने धावत होती. 

केरळमधून सुटणारी मंगला एक्‍स्प्रेस आणि मंगळुरु येथून सुटणारी मुंबई एक्‍स्प्रेस या गाड्या गेले तीन दिवस 10 ते 15 तास विलंबाने धावत होत्या. या गाड्यांच्या वेळापत्रकात आज बदल केला. यानुसार सकाळी 10.45 वाजता एर्नाकुलम येथून सुटणारी मंगला एक्‍स्प्रेस त्या स्थानकातून सायंकाळी 4.45 वाजता सोडली जाणार होती. तर काल (ता. एक) मंगळुरु येथून सायंकाळी 4.45 वाजता सुटणारी मुंबई एक्‍स्प्रेस आज (ता. दोन) दुपारी 2 वाजता मंगळुरु येथून सुटणार असल्याचे कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आले. 

मुंबईला जाणाऱ्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने मुंबईला नियमितपणे सुटणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, तुतारी एक्‍स्प्रेस, जनशताब्दी, दिवा पॅसेंजर या गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. या सर्व गाड्या सिंधुदुर्गातील स्थानकात प्रवाशांनी फुल्ल होऊन जात आहेत. त्यामुळे राजापूर ते रत्नागिरी या स्थानकात या गाड्यांचे दरवाजे उघडले जात नाहीत. त्यामुळे तेथील प्रवाशांदरम्यान वारंवार वादंगाचे प्रकार होत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी या गाड्यांमध्ये जादा पोलिस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: konkan news konkan railway ganesh festival 2017