कोकणी लोककला पुढील पिढीला देणारे चोगले बुवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

देवरूख -  कोकण म्हणजे लोककलांची खाण, मात्र आजच्या आधुनिक युगात ही लोककला अस्तंगत होत असतानाच ही कला जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यात नव्या पिढीचा समावेश वाढविण्यासाठी एक अवलिया गेली २१ वर्षे झटत आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील धामणी गवळवाडी येथील भिकाजीबुवा चोगले असे त्यांचे नाव आहे. स्वतः या कलाप्रकारांची सेवा करताना स्थानिक पातळीवर शेकडो कलाकार घडविण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे.

कोकणातील जाखडी, नमन, भारूड, भजने, टिपऱ्या आदी कलाप्रकार लोककलांमध्ये मोडतात. मात्र कालपरत्वे हे प्रकार केवळ सणासुदीपुरते उरले असून सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची जागा ऑर्केस्ट्रा वा इतर प्रकारांनी घेतली आहे. अशा कालावधीत नवे कलाकार तयार होणे म्हणजे दुर्मीळच. नव्या पिढीलाही ही उपजत कला सांभाळताना नाकीनऊ येत असतानाच धामणी गवळवाडीचे सुपुत्र आणि कामानिमित्त चिपळूणमध्ये स्थायिक झालेले भिकाजीबुवा चोगले या लोककलांचे जतन करण्यासाठी गेली २१ वर्षे काम करीत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे चालक संतोष काताळकर व आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ते गेली २१ वर्षे नमन व जाखडी हा कलाप्रकार अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. भजन, भारूड, अभंग अशा प्रकारांमध्येही चोगलेबुवा यांचे योगदान लाभते. आपल्या कामाच्या व्यस्त वेळातून सवड काढून ते या प्रकारांचा नियमित सराव करतात. कार्यक्रमात नव्या पिढीलाही समाविष्ट करून घेतात. ही कला नव्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी ते झटत आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल स्थानिक पातळीवर त्यांचा अनेकवेळा गौरव झाला आहे. आपल्या नमन या कलाप्रकारात पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम साधत त्यांनी जुन्या आणि नव्या प्रेक्षकांना पुन्हा या प्रकाराकडे आकर्षित करण्याचे मोठे काम केले आहे. विशेष म्हणजे नमनात स्त्री पात्रही बुवा साकारतात. त्यांच्या वगनाट्यातील काळू-बाळू ही जोडी प्रेक्षकांना हसून बेजार करते.

आपल्याला उपजत या कलाप्रकाराचे वरदान लाभले. आपण २१ वर्षे या कलाप्रकारात सहभागी होऊन लोककलांची सेवा केली. आता तरुण पिढीला यात सहभागी करून हे कलाप्रकार जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कला राहिल्या तरच कोकणची संस्कृती जिवंत राहील.
-भिकाजीबुवा चोगले

Web Title: konkan news konkani lokkala