कृषी कर्ज फेडलेल्यांना अनुदान द्या - सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील शेतकरी हा प्रामाणिकपणे कर्जफेड करत असतो. यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या कर्जाची रक्कम मिळावीच तसेच ते नियमित कर्ज भरत असल्याने त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. याचप्रमाणे या कर्जमाफी योजनेत शेती पूरक व्यवसाय योजनेचा समावेश करावा, अशी मागणी जिल्हा बॅंकेतर्फे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील शेतकरी हा प्रामाणिकपणे कर्जफेड करत असतो. यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या कर्जाची रक्कम मिळावीच तसेच ते नियमित कर्ज भरत असल्याने त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. याचप्रमाणे या कर्जमाफी योजनेत शेती पूरक व्यवसाय योजनेचा समावेश करावा, अशी मागणी जिल्हा बॅंकेतर्फे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफीबाबत काल सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतर्फे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी भेट घेत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक अविनाश माणगांवकर, प्रकाश मोर्ये, प्रकाश गवस, प्रकाश परब, नीता राणे, प्रज्ञा परब, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, प्रमोद धुरी, रामचंद्र मर्गज आदी उपस्थित होते. 

श्री. सावंत म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीबाबत ११ ला शासनाने घोषणा केली; मात्र याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना किंवा शासन निर्णय बॅंकेला प्राप्त नाही. यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यात गतवर्षी जिल्हा बॅंकेतर्फे सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना ११० कोटींचे कर्ज दिले होते. 

यातील  ८० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली आहे. यामुळे कर्जमाफी ही ३१ मार्च २०१६ ही तारीख थकीत म्हणून धरावी, नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा. त्यांनी भरलेल्या कर्जाची रक्कम त्यांना मिळावीच त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, खावटी स्वरुपात देण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसायासाठी देण्यात आलेल्या कर्जाचाही या कर्जमाफी योजनेत सहभाग करून त्यांनाही कर्जमाफी मिळावी, असा मागणी करणारे ठराव आजच्या जिल्हा बॅंकेच्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आले. 

ही बैठक झाल्यावर जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी समाजातील आपली पत सांभाळण्यासाठी काहीही करून आपले कर्जफेड करत असतो. यामुळे शासनाकडून कर्जमाफी झाल्यानंतर त्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत नाही. नियमित आणि प्रामाणिकपणे शेती कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. 
- सतीश सावंत, अध्यक्ष, जिल्हा बॅंक

Web Title: konkan news loan satish sawant