कमी उंचीच्या पुलाने  दोडामार्गमध्ये धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

दोडामार्ग - तालुक्‍यातील कमी उंचीचे पूल पावसाळ्यात धोकादायक बनत आहेत. कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तर तुटतोच; पण काहीजण जीव धोक्‍यात घालून पुलावर पाणी असतांना पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने प्राणहानीचीही भीती आहे.

दोडामार्ग - तालुक्‍यातील कमी उंचीचे पूल पावसाळ्यात धोकादायक बनत आहेत. कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तर तुटतोच; पण काहीजण जीव धोक्‍यात घालून पुलावर पाणी असतांना पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने प्राणहानीचीही भीती आहे.

तालुक्‍यातील अनेक गावे नदी ओहोळामुळे छोट्या छोट्या पुलांनी जोडली आहेत. तिलारी नदीमुळे तर अनेक गावात पाटबंधारे विभागाने छोटे छोटे कॉजवे बांधले; पण ते खूपच कमी उंचीचे आहेत. परमे, कुडासे येथे तिलारी नदीवरही छोटे कॉजवे होते. अनेकांचा जीव गेल्याने तेथे आता पुलाची उंची वाढवून वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र घोटगेवाडी गावाला जोडणारी कोनाळहून येणारे व तिलारीहून येताना मिळणार दोन्ही कॉजवे कमी उंचीचे असल्याने नेहमी पाण्याखाली असतात. त्यामुळे अनेकदा ते मार्ग बंद राहतात आणि घोटगेवाडी, केर, मोर्ले गावांचा संपर्क तुटतो. कुडासे वानोशी येथेही कमी उंचीच्या पुलामुळे गैरसोय होते. 

तशीच अवस्था मुळस जोडणाऱ्या कॉजवेची आहे. खरारी नदीवरील तो छोटा पूल कायम पाण्याखाली असतो. त्यापूर्वी तेथून वाहून गेल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या म्हशीही मृत्युमुखी पडल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत आघाडी आणि युतीचे आमदार, खासदार झाले; पण त्या पुलाची उंची वाढविण्याबाबत कुणीच काही केलेले नाही.

दोडामार्ग-तिलारी मार्गावरील साटेली भेडशी येथील कॉजवेवर तर बहुतेकवेळा पाणी असते. अचानक कॉजवे पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे पुलापर्यंत येऊन एस.टी. चालक आणि अन्य वाहनचालकांना आपल्या गाड्या कसरत करीत मागे (रिव्हर्स) न्याव्या लागतात आणि पर्यायी मार्गाने तिलारीकडे जावे लागते. पावसाळ्यात दरवर्षी असेच असते. प्रश्‍न तेच असतात. उत्तरे मात्र मिळत नाहीत. भविष्यात मोठी जीवित वा वित्तहानी होण्याआधी शासनाने घोटगेवाडी, मुळस-हेवाळे, वानोशी, पणतुर्ली, आयी, वझरे येथील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: konkan news Low height bridge