नगरसेविकेसह नागरिकांची पालिकेवर धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

मालवण - पालिकेच्या वतीने विहिरींच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने तसेच डास फवारणी बंद असल्याने आज नगरसेविका दर्शना कासवकर, भाई कासवकर मित्रमंडळाच्या वतीने संतप्त नागरिकांनी येथील पालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांनी वरिष्ठ लिपिक संगीता कुबल यांना निवेदन सादर केले.

धुरीवाडा येथील भाई कासवकर मित्रमंडळाच्यावतीने पंकज गावकर, संजय कासवकर, शिवाजी केळुसकर, मनोज मेथर, परेश जोगी, भूषण कासवकर, लीलाधर सावबा, राजू सावंत, दर्शना कासवकर, सत्यवान खोर्जे यांच्यासह अन्य नागरिकांनी आज पालिकेत धडक दिली. मुख्याधिकारी रंजना गगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उपस्थित नसल्याने नागरिकांनी वरिष्ठ लिपिक श्रीमती कुबल यांना निवेदन सादर केले. पालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहरात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी पावसाळ्यात विहिरींच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत होती तसेच आठवड्यातून एकदा डास फवारणी केली जात होती. मात्र यावर्षी पालिकेच्यावतीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विहिरीतील पाण्याची शुद्धीकरण होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय डास फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे असे कासवकर यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

पाणी शुद्धीकरणाअभावी सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये ताप, उलटी, जुलाबाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंगी तसेच अन्य साथीचे आजार वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेने पाणी शुद्धीकरणाबरोबरच डास फवारणीसाठी आवश्‍यक उपाययोजना तत्काळ राबवावी. याची कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: konkan news malvan corporator