मंडणगडातील चारही धरणे तुडुंब

मंडणगडातील चारही धरणे तुडुंब

मंडणगड - तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे भरून वाहू लागली आहेत. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत १६८१ मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवारी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्‍यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंडणगड तालुक्‍यात १९७९ मध्ये चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. ३८ वर्षानंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सर्वांत आधी भरत असून गळतीमुळे मात्र पावसाळा संपल्यानंतर झपाट्याने याच्या पाणीसाठ्यात घट होते. तर भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७, पंदेरी धरण ४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. मात्र या धरणांचे कालवे अपूर्ण अवस्थेत असून ते बुजले आहेत. तिडे येथील धरणाचे काम सुरू आहे. महत्त्वाकांक्षी व पूर्ण झालेल्या चार धरणांमुळे तालुक्‍यातील ७४६ हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. संततधारेने नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. कडीकपाऱ्यांतील धबधबे कोसळू लागल्याने पर्यटकांसह स्थानिकही धबधब्याचा यथेच्छ आनंद लुटत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, घोसाळे, पणदेरी घाटात रस्त्याशेजारून अनेक लहानमोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. याचबरोबर धरण परिसरातील दूरवर पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येते.

पावसाळी पर्यटनाच्या नियोजनाची गरज
पावसाळ्याच्या दिवसात तालुक्‍यातील अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करू शकतात. मात्र पर्यटक याकडे कसे वळतील आणि यातून रोजगारनिर्मिती कशी होईल याकरिता नियोजनाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पर्यटकांना अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com