शहीद राजेंद्र गुजर यांना अखेरचा निरोप

सचिन माळी 
मंगळवार, 11 जुलै 2017

मंडणगड - अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असताना अपघातग्रस्त झालेल्या वायुदलाच्या ध्रुव या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या पालवणी जांभुळनगर येथील जवान राजेंद्र यशवंत गुजर यांना हजारोंच्या उपस्थितीत साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री आठ वाजता शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. ‘भारत माता की जय’, ‘राजेंद्र गुजर अमर रहे’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, राजू तेरा नाम रहेगा’... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घोषणा आणि नातेवाइकांच्या आक्रोशामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले आणि अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

गुजर यांचे पार्थिव सोमवारी सकाळी पालवणी जांभुळनगर या मूळ गावी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्‍यातून नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. आपल्या लाडक्‍या भूमिपुत्राचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांपासून महिलांनीही प्रचंड गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शहीद राजेंद्र गुजर यांना आदरांजली वाहणारे फलक लावले होते. हेलिकॉप्टर अपघातानंतर चार दिवसांच्या शोध कार्यानंतर गुजर यांचा मृतदेह शनिवारी सापडला. मात्र खराब हवामानामुळे तब्बल तीन दिवसानंतर आज त्यांचे पार्थिव तेजपूर येथून विमानाने मुंबई येथे आले. दुपारी हवाई दलाचा ताफा शहीद जवान राजेंद्र गुजर यांचे पार्थिव घेऊन मंडणगडकडे रवाना झाला. सायंकाळी सव्वासात वाजता जांभुळनगर येथे आणण्यात आले. राजेंद्र यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांचे आई, वडील व तमाम तालुकावासीयांनी घेतले. 

शहीद राजेंद्र यांना त्यांचे वडील निवृत्त मेजर यशवंत गुजर यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी भारतीय वायुदलाचे जवान व जिल्हा राखीव पोलिस दलाचे जवान यांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली; तर जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदरांजली अर्पण केली.

या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, विभागीय पोलिस अधीक्षक श्रीमती जानवे, प्रांताधिकारी जयराम देशपांडे तहसीलदार, प्रशांत पानवेकर, कविता जाधव, आमदार संजय कदम, आमदार भाई जगताप, माजी आमदार सूर्यकांत दळवी, सभापती आदेश केणे व विविध क्षेत्रातील राजकीय सामाजीक संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातेसह नातेवाइकांचा आक्रोश
संध्याकाळी सातच्या सुमारास शहीद जवान राजेंद्र गुजर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी जांभुळनगर येथे दाखल झाले. गुजर यांच्या घरासमोर जनसमुदाय होता. राजेंद्र यांच्या आईसह नात्यातील महिलांना त्यांच्या निधनाची बातमी शनिवारी रात्रीपर्यंत सांगितली नव्हती. ही बातमी समजताच संपूर्ण दोन रात्री महिलांनी जागून काढल्या. राजेंद्र यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचताच ‘माझा राजू’ म्हणत आईने आणि महिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकत होता. वडील व भाऊ दोघेही सैन्यात असल्याने त्यांनी भावना रोखून धरल्या.

Web Title: konkan news mandangad rajendra gujar