मुंबई-गोवा एक्‍स्प्रेस वे व्हावा कोकणच्या समृद्धीचा महामार्ग

राजेश सरकारे
शुक्रवार, 23 जून 2017

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव संपूर्ण देशभर रस्त्यांच्या, पुलांच्या अन्‌ उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नागपूरच्या विकासासाठी जशी समृद्धी महामार्गाची आखणी केली, त्याच धर्तीवर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई-गोवा एक्‍स्प्रेस वे हा कोकणच्या समृद्धीच्या महामार्ग ठरावा अशीच अपेक्षा प्रत्येक कोकणवासीयांची आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती मिळाली. सिंधुदुर्गातून अवघ्या पाच ते सहा तासांत मुंबईचे अंतर पार करता येणार आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव संपूर्ण देशभर रस्त्यांच्या, पुलांच्या अन्‌ उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नागपूरच्या विकासासाठी जशी समृद्धी महामार्गाची आखणी केली, त्याच धर्तीवर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई-गोवा एक्‍स्प्रेस वे हा कोकणच्या समृद्धीच्या महामार्ग ठरावा अशीच अपेक्षा प्रत्येक कोकणवासीयांची आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती मिळाली. सिंधुदुर्गातून अवघ्या पाच ते सहा तासांत मुंबईचे अंतर पार करता येणार आहे. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या नितीन गडकरी यांनी तीन वर्षांत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मे २०१५ मध्ये चौपदरीकरणासाठी मोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला; तर उद्या (ता. २३) महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ होत आहे. पुढील तीन ते चार वर्षांत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. या महामार्गात काय काय असणार आहे याचा हा आढावा...

तीन टप्प्यात चौपदरीकरण...
मुंबई-गोवा महामार्गातील कशेडी ते झाराप या अंतराचे चौपदरीकरण तीन टप्प्यांत होणार आहे. यात कशेडी ते ओझरखोल (१६१ ते २६५ कि.मी.), ओझरखोल ते राजापूर (२६५ ते ३५१ कि.मी.) आणि राजापूर ते झाराप (३५१ ते ४५०) असे तीन टप्पे करण्यात आले आहेत. दरम्यान पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकणाचे काम सहा वर्षे रेंगाळले असून ते पुढील वर्षअखेरपर्यंत पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता आहे.

६४३ वळणे इतिहासजमा होणार
कशेडी ते झाराप या महामार्गाच्या टप्प्यात ६४३ वळणे आहेत; तर ८ वळणे अतिशय धोकादायक मानली जातात. याखेरीज ठिकठिकाणी असलेल्या घाटमार्गाची लांबी ८३ किलोमीटर आहे. ही सर्व वळणे आणि घाटमार्ग चौपदरीकरणात संपुष्टात येणार आहे. यासाठी अनेक ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले घाटमार्ग आणि वळणे तसेच ठेवून फारशी वळणे नसलेल्या पर्यायी मार्गाची आखणी केली आहे.

११ फूटपाथ, भुयारी मार्ग, उड्डाणपूल
या टप्प्यात ११ ठिकाणी भुयारी आणि उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. कणकवली, ओरोस, कुडाळ, तळेरे, नांदगाव, कसाल या शहरांसह अन्य पाच ठिकाणी फूटपाथ असणार आहेत. राजापूर ते झाराप या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ३० बसस्टॉप आणि २ ठिकाणी ट्रकसाठी टर्मिनल असणार आहे. महामार्गावर ६ ठिकाणी मोठे जंक्‍शन आणि ५७ ठिकाणी लहान जंक्‍शन असणार आहेत. तसेच बांधकाम आराखड्यात ३०५ मोऱ्यांचा समावेश आहे.

कणकवलीत उड्डाणपूल, नांदगावला भुयारी मार्ग
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव तिठा येथे भुयारी मार्ग मार्ग केला जाणार आहे. या मार्गातून देवगड-निपाणी या राज्यमार्गावरील वाहतूक असणार आहे. कणकवली, तळेरे आणि कासार्डे फाटा येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. याखेरीज हुंबरट आणि नडगिवे या घाटमार्गांना पूर्ण वळसा घालून नवीन मार्ग केला जाणार आहे.

कणकवली, कुडाळमध्ये ट्रक टर्मिनल
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना विश्रांतीसाठी कणकवली आणि कुडाळ येथे ट्रक टर्मिनल असणार आहेत. कणकवली तालुक्‍यात बेळणे आणि कुडाळ तालुक्‍यात टेंबधुरीनगर येथे ट्रक टर्मिनलसाठी अतिरिक्‍त जागा संपादीत करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात २२ बस थांबे 
महामार्गालगतच्या गावांसाठी २३ ठिकाणी एस. टी. बस थांबे प्रस्तावित आहेत. या सर्व ठिकाणी सर्व्हिस रोड करून तेथे बसथांबे उभारले जाणार आहेत. यात कणकवली तालुक्‍यात ११ तर कुडाळ तालुक्‍यातील १२ ठिकाणच्या बसथांब्यांचा समावेश आहे. 

३५ गावांसाठी ७३४ कोटींचा मोबदला
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी डिसेंबर २०१५ मध्ये अधिसूचना काढण्यात आली. तर डिसेंबर २०१६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ गावांचा ७३४ कोटी ८२ लाखांचा निवाडा सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. यातील बहुतांश खातेदारांना मोबदला स्वीकारण्यासाठीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.  कणकवलीसह हळवल, वागदे यागावांचा मोबदला जाहीर व्हायचा आहे. एकूण मोबदला १ हजार कोटीपर्यंत जाणार आहे. 

पाचपट मोबदल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधान
महामार्ग चौपदरीकरण बाधितांना सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देण्यात आला. बाजारभावाच्या सरासरी पाच पट मोबदला मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमधून समाधान व्यक्‍त होतेय. तर अनेक खातेदारांनी हरकती सुद्धा नोंदविल्या आहेत.

किनारी जोड मार्ग देखील तातडीने व्हावेत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ते समुद्र किनारे यांना जोडणारे रस्ते दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाने तयार केला आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील कसाल ते मालवण, कणकवली ते आचरा, नांदगाव ते देवगड आणि कासार्डे ते विजयदुर्ग या मार्गांचे दुपदरीकरण होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणारोबरच या रस्त्यांचीही कामे तातडीने होण्याची अपेक्षा पर्यटन उद्योगाला आहे. किनारी मार्ग दुपदरीकरण झाले तर किनारी पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच त्याभागात नवीन रोजगार निर्मिती देखील होणार आहे. 

प्रतिक्रिया
महामार्गावर टोल नाके नकोत

मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर ते झाराप या ३६६.१७० कि.मी. भागासाठी पाच टोल नाके प्रस्तावित करण्यात आले आहेत. यात सिंधुदुर्गात ओसरगांव येथे तर रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथे टोलनाके बसणार आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल असणार नाही अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. परंतु सध्याच्या निविदा प्रक्रियांनुसार अंदाजपत्रकीय खर्चाच्या रक्‍कमेत ६० टक्‍के खर्च ठेकेदाराला करावा लागणार आहे. तर उर्वरित ४० टक्‍के रक्‍कम शासन देणार आहे. यामुळे ठेकेदाराने केलेला खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. मात्र महामार्ग पूर्णत्वानंतर टोल नकोच अशी भावना वाहनचालकांसह सर्वसामान्य प्रवासीवर्गाची आहे.
- वाहनचालकांसह सामान्य प्रवासी

बचतगटांसाठी स्वतंत्र व्यवस्था हवी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणामध्ये स्थानिकांचाही विकास व्हायला हवा. प्रस्तावित मुंबई गोवा महामार्गालगत ठिकठिकाणी फूड मॉल तयार होणार आहेत. पण तेथे स्थानिक बचतगटांना कितपत संधी मिळेल याबाबत साशंकता आहे. यामुळे प्रत्येक पाच किलोमीटर टप्प्यात स्थानिक बचतगटांसाठी स्वतंत्र मार्केट व्यवस्था सरकारने निर्माण करायला हवी. तरच जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
- स्नेहा राणे, बचतगट प्रतिनिधी

ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित व्हाव्यात
मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड वळणांमुळे आजवर हजारो प्रवाशांचा अपघातात बळी गेला आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाले म्हणजे अपघात होणारच नाहीत, अशी स्थिती नाही. मात्र अपघात झाल्यानंतर जखमींवर तातडीने व्यवस्था व्हावी यासाठी प्रस्तावित असलेली ट्रामा केअर सेंटर देखील तातडीने सुरू व्हायला हवीत. रत्नागिरी, राजापूर, तळेरे, कणकवली, कुडाळ याठिकाणी ट्रामा केअर सेंटर्स उभारणीसाठी देखील केंद्राने तातडीने कार्यवाही करायला हवी.
- मोहन केळुसकर, अध्यक्ष, कोकण विकास आघाडी

कोकणच्या व्यापार उदिमाला चालना 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कोकणच्या व्यापार उदिमाला चालना मिळणार आहे. नवे उद्योग आणि त्यातून नव्या रोजगार संधी देखील जिल्ह्यात उपलब्ध होतील. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासामध्ये देखील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीरकरणामुळे मोठा हातभार लागणार आहे. त्याअनुषंगाने पर्यटन व इतर उद्योगांसाठी वेगळी धोरणे निश्‍चित करणे देखील आवश्‍यक ठरणार आहे. आंबा, काजू व कोकणात उत्पादित होणाऱ्या फळांवर प्रक्रिया उद्योगांसाठी देखील केंद्र आणि राज्याने वेगळे धोरण निश्‍चित करावे लागणार आहे. 
- महेश नार्वेकर, सचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: konkan news mumbai god express way of Konkan prosperity