नारायण राणे भाजपात आल्यास स्वागतच करूः राजन तेली

narayan rane
narayan rane

वरिष्टांशी चर्चा झाली आता विरोधाचा प्रश्‍न नाही

सावंतवाडीः माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपात आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, आम्ही जिल्हा भाजपाने वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता विरोधाचा प्रश्‍नच उरत नाही, असा दावा माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत केला.

श्री. राणे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या श्री. तेली यांनी दोन वर्षापुर्वी राणेंशी फारकत घेत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राणेंवर टिका केली होती. राणेंच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा भाजपाकडून झालेल्या विरोधात तेली यांचे नाव होते. आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंना प्रवेश द्यायचा हा पक्षाचा निर्णय आहे. तो आपल्याला मान्य आहे, असेही श्री. तेली यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा भाजपासह तेली यांना विरोध मावळल्याचे चित्र आहे.

श्री. तेली यांनी आज येथे भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, बांद्याचे माजी सरपंच मंदार कल्याणकर, चंद्रकांत जाधव, सुप्रिया केसरकर आदी उपस्थित होते. यावेळी मळगाव येथील माजी पंचायत समिती सदस्या वर्षा हरमलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले.

त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले,“राणेंच्या पक्ष प्रवेशाला आमचा विरोध नाही. ते आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ते आता ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा राजीनामा कधी देतील हे अद्याप आपल्याला माहिती नाही. ते त्यांनाच तुम्ही विचारा.”

ते पुढे म्हणाले,“जिल्ह्यातील वनसंज्ञा, सीआरझेड आणि बीएसएनएल सेवा हे प्रश्‍न गंभीर आहेत. ते प्रश्‍न सोडविण्यासाठी रेल्वेमंत्री तथा जिल्ह्याचे सुपूत्र प्रयत्न करीत आहे. गेल्या अनेक वर्षात हे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत; मात्र आता भाजपाच्या काळात त्या प्रश्‍नांना नक्कीच वाट मिळेल त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होणार आहे.”

शिवसेना सोडली ही जीवनातील मोठी चूक
राणे भाजपात आले तर श्री. तेली शिवसेनेत जातील अशी चर्चा आहे. याबाबत श्री. तेली म्हणाले,“आयुष्यात नेत्यांच्या प्रेमापोटी बारा वर्षापुर्वी एक मोठी चुक केली, ती म्हणजे शिवसेना सोडली. झालेली चूक सुधारण्यासाठी पुन्हा दोन चुका कराव्या लागल्या; मात्र आता पक्ष बदलणार नाही. काही झाले तरी मी भाजपात राहणार आहे. त्यामुळे कोणी वावड्या उठवित असेल तर ते चुकीचे आहे. त्यात कोणाचाही हेतू साध्य होणार नाही.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com