दक्षिण रत्नागिरीत राष्ट्रवादीचा पाय खोलातच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

देवरूख - राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा शिवसेनेने संघटना बांधणीसाठी पावले उचलली आहेत. त्याचीच री ओढत राष्ट्रवादीनेही जिल्हा मेळावा घेत पक्षवाढीसाठी पुढाकार घेतला; मात्र जिल्ह्यातील सध्याचे राजकारण पाहता उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीला सुगीचे दिवस येऊ शकले, तरी दक्षिण रत्नागिरीत राष्ट्रवादीचा पाय खोलातच आहे. येथील चार तालुक्‍यांत राष्ट्रवादीला मेहनत घ्यावी लागणार.

राज्यातील सत्तेचे घोडे वारंवार अस्थिर होते. विद्यमान सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना वारंवार पाठिंबा काढण्याच्या घोषणा करीत असल्याने वैतागलेले भाजप नेतृत्व पुढील वर्षभरात राज्यात मध्यावधी घेण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पक्षप्रमुखांनी सेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष बळकट करून निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शिवसेनेने शिवसंपर्क मोहीम हाती घेतली.

जिल्ह्यात सेनेपाठोपाठ मजबूत राष्ट्रवादीनेही यामध्ये उडी घेतली आहे. यासाठी राष्ट्रवादीचा जिल्हा मेळावा दोनच दिवसांपूर्वी पार पडला. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असे दिग्गज होते. भास्कर जाधवांना पूर्ण स्वातंत्र्य जाहीर झाले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार उत्तर रत्नागिरीतील आहेत. दक्षिण रत्नागिरीत उदय सामंत यांच्या पक्षबदलामुळे राष्ट्रवादी मोठ्या संकटात सापडली आहे. संगमेश्‍वर, लांजा, राजापूरमध्येही राष्ट्रवादीची ताकद असली तरी इथे हक्‍काचे नेतृत्व नाही. चिपळूणमध्ये रमेश कदम भाजपमध्ये गेल्याने शहरात राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. चिपळूणसह संगमेश्‍वरचा भार आता जिल्हाध्यक्ष शेखर निकमांवर आहे. तेच आगामी निवडणुकीचे उमेदवार असल्याने त्यांना दक्षिण रत्नागिरीत पक्षवाढीबरोबरच स्वतःचा मतदारसंघ बांधणे क्रमप्राप्त ठरणार आहे. अशा स्थितीत त्यांना हक्‍काने साथ देणारे कुणीच नाही. यामुळेच दक्षिण रत्नागिरीत राष्ट्रवादीचा पाय खोलातच असल्याचे उघड आहे.

उदय सामंतांचा करिश्‍मा मोठा
रत्नागिरीतील हानी भरून काढण्यासाठी जिल्ह्याचा मेळावा जरी रत्नागिरीत झाला असला, तरी उदय सामंत यांच्या करिश्‍म्यापुढे इथे राष्ट्रवादीचे काही चालेल अशी सध्या तरी स्थिती नाही. यामुळे निवडणुका मध्यावधी होवोत अगर सार्वत्रिक, दक्षिण रत्नागिरीत बस्तान बसवण्याचे आव्हान पेलणे राष्ट्रवादीला कठीणच आहे.

Web Title: konkan news ncp