‘त्या’ हप्तेखोर अधिकऱ्यावर हवी करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. सुरू केलेल्या कारवाईबाबत सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे; मात्र जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी अवैध धंद्यांबरोबरच अशा धंद्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिस अधिकारी व संबंधित पोलिसपाटील यांच्यावर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. मध्यंतरी अचानक अवैद्य धंद्यांना पेव फोडण्यामागे असलेल्या त्या हप्तेखोर अधिकाऱ्याला शोधून काढून अशा प्रवृत्तींना कायमचा लगाम घालण्याची मागणीही जोर धरत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने गोवा बनावटीची दारू या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आयात होते. अवैध धंदेवाईक जिल्ह्यातील पोलिस तपासणीचे अडथळे पार करत आणि काहीवेळा तेथील कर्मचाऱ्यांशी आर्थिक व्यवहार निश्‍चित करून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे; मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही प्रमाणात कारवाईही केली; मात्र काही दिवसात अवैध धंद्यांना पुन्हा एकदा जोर चढला होता. पोलिस यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारीच अवैध धंद्यांना सहकार्य करत असल्याचा संशय व्यक्त होत होता. या काळात एका अधिकाऱ्याने अवैद्य धंदे पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या आठ महिन्यातील हप्त गोळा केले अशी चर्चा आहे. त्यानंतर अवैद्य धंद्यांचे पेव फुटले. याबाबत प्रसिद्धी माध्यमातूनही आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांनी आपल्या नेतृत्वाखालील विशेष पथक कार्यरत करुन गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्याची झोप उडविली आहे. वारंवार सुरु असलेले दारूधंदे, जुगार, मटका अशा ठिकाणी छापा टाकत आरोपींना ताब्यात घेतले, तर अशा गैरधंद्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा दाखविला. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील अवैध धंदेवाईक धास्तावले आहेत.

जिल्ह्यात विविध पोलिस ठाणे कार्यरत आहेत आणि या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अवैध धंद्याची खबर संबंधीत पोलिसांना मिळू नये हेच मुळात संशयास्पद आहे.  तेथील अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिस अधीक्षकांच्या पथकाला मिळते आणि कारवाई केली जाते, मग स्थानिक पोलिस अधिकारी यांची भूमिका काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे. तरी अशा गैरधंद्याशी जोडलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. तरच स्वतः पोलिस अधीक्षकांना प्रत्यक्ष मोहिमेवर जाण्याची वेळ येणार नाही.

पोलिसपाटलांचे कर्तव्य काय?
गावचा पोलिसपाटील हा पोलिस प्रशासन आणि जनता यातील दुवा आहे. गावात सुरू सलेले अवैध धंदे, अनोळखी व्यक्ती, आणि इतर घडामोडी याबाबत माहिती देणे, गावात शांतता राखणे आदी कर्तव्ये पोलिसपाटील या पदाची आहेत. काही पोलिसपाटील आदर्शवत असे कर्तव्य बजावत असले तरी काही पोलिसपाटीलच अशा अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचे समोर येत आहे. तरी ज्या गावात अवैध धंदे सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहेत, अशा पोलिसपाटील यांच्यावर प्रांताधिकाऱ्यांकडून कारवाई होण्याची गरज आहे. तरच विविध गावांमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यापर्यंत पोचता येणार आहे आणि तशा कारवाईची अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

Web Title: konkan news police sindhudurgnagari