रेल्वेच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींना हाक

तुषार सावंत
शुक्रवार, 23 जून 2017

रेल्वेमंत्र्यांचे पत्र - खासदार, आमदारांसह सरपंचांना सहभागी करून घेणार 

कणकवली - देशातील मोदी सरकारच्या तीन वर्षांतील विकासाचा आढावा देऊन आगामी योजना तसेच विकास नियोजनामध्ये प्रत्येकाचा सहभाग घेण्याच्या हेतूने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

रेल्वेमंत्र्यांचे पत्र - खासदार, आमदारांसह सरपंचांना सहभागी करून घेणार 

कणकवली - देशातील मोदी सरकारच्या तीन वर्षांतील विकासाचा आढावा देऊन आगामी योजना तसेच विकास नियोजनामध्ये प्रत्येकाचा सहभाग घेण्याच्या हेतूने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

देशभरातील खास तसेच राज्यातील प्रत्येक आमदार आणि गावातील सरपंचांना रेल्वे विकास कामात सहभाग घेण्याचे आवाहन एका पत्राद्वारे केले जात आहे. यासाठी रेल्वेच्या १७ विभागीय कार्यालयांना जबाबदारी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरेश प्रभू यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे. रेल्वेच्या इतिहासातील रेल्वे बजेट सादर न करता रेल्वेचा विकास साधत असताना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षात रेल्वे मंत्रालयाकडून ज्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या त्याच्या यशस्वीतेबाबत प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम  श्री. प्रभू यांनी सुरू केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ज्या योजना राबविण्यात आल्या आणि यापुढेही ज्या योजना राबविण्यात येणार आहेत त्यात लोकप्रतिनिधींची अपेक्षा आणि योजनांमधील काही सुधारणा व्हाव्यात या अनुषंगाने हा पत्रव्यवहार होत आहे. देशात रेल्वेने प्रत्येक वर्षी ७.२ अब्ज लोक प्रवास करतात. रेल्वेने कमी खर्चात चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकते जीणे लावले जात असून अपंगांसाठी चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. रेल्वेने सन २०१५-१६ या वर्षात २ हजार ८२८ किलोमीटर नवीन रेल्वेलाईन, १७३० किमी. गेजमध्ये परीवर्तन आणि दुपदरीकरण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या रेल्वेगाड्या सुरू करून दर्जेदार प्रवास सुरू केला आहे. या सर्व उपक्रमात लोकप्रतिनिधी सहभागी व्हावेत. भारतीय रेल्वेच्या प्रगतीची माहिती गावपातळीवर पोहोचावी या उद्देशाने पत्र लिहून माहिती दिली जात आहे. 

भारतीय रेल्वेच्या पश्‍चिम विभागांतर्गत गुजरात राज्यात १३ हजार सरपंचांना अशा चिठ्ठ्या पाठविण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी रेल्वेच्या सेवानिवृत्तधारकांनाही विकास परिवर्तनाबाबतचे पत्र पाठवून या गतीत आपल्या सुचना पाठविण्यासाठी पत्रव्यवहार करून निमंत्रित केले आहे.

कोकण रेल्वेची प्रगती 
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे पाच वर्षे प्रतिनिधित्व श्री. प्रभू यांनी केले आहे. त्यामुळे या कोकणपुत्राकडून कोकणातील रेल्वेच्या विकासासाठी मोठ्या अपेक्षा होत्या. मागील तीन वर्षांत कोकण रेल्वे महामंडळाच्या आधुनिकीकरणाबरोबरच तेजस सारखी वेगवान अालिशान गाडी, स्थानकांचे सुशोभिकरण तसेच कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या पायाभरणीचा प्रारंभ श्री. प्रभू यांनी करून कोकणच्या विकासाला गती दिली आहे.

Web Title: konkan news railway development public leader speak